Join us  

काही साम्य ऐसे भी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2016 7:41 AM

छोट्या पडद्यावर सध्या दोन मालिका खूप गाजतायत. यातील एक मालिका मराठी तर दुसरी हिंदी आहे. अल्पवधीतच रसिकांच्या मनात अढळ ...

छोट्या पडद्यावर सध्या दोन मालिका खूप गाजतायत. यातील एक मालिका मराठी तर दुसरी हिंदी आहे. अल्पवधीतच रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या या मालिका म्हणजे काहे दिया परदेस आणि कुछ रंग प्यार के ऐसे भी.दोन्ही मालिकांमधील कलाकार, त्यांचा अभिनय आणि कथा रसिकांना भावतेय.. या मालिकांचा एकत्र उल्लेख करण्याचं कारण म्हणजे या दोन्ही मालिकांमध्ये असलेल्या ब-याचशा सारख्या गोष्टी.. जवळपास एकाच वेळी या दोन्ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाल्या.मात्र दोन वेगवेगळ्या भाषा असूनही त्यातील काही गोष्टी सारख्याच असल्याचं वाटतं. सगळ्यात चटकन लक्षात येणारी पहिली गोष्ट म्हणजे या दोन्ही मालिकांच्या कथेचा मूळ गाभा हा लव्ह स्टोरी आहे. काहे दिया परदेस या मालिकेत गौरी आणि शिव या दोघांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आलीय. तर दुसरीकडे 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेत देव आणि सोनाक्षीची लव्हस्टोरी बहरत चालली आहे. दोन्ही मालिकेतील कपलच्या लव्ह स्टोरीची सुरुवात थोडी भांडणं, थोडं रुसवा, थोडा फुगवा यापासून सुरुवात झालीय.. या दोन्ही मालिकेत आणखी एक मुख्य समानता म्हणजे यामध्ये घडणारं भिन्न संस्कृतीचं दर्शन.'काहे दिया परदेस' या मालिकेत शिव हा उत्तर भारतीय तर गौरीचं कुटुंब मराठमोळं दाखवण्यात आलंय. तर 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेतील सोनाक्षीचं कुटुंब बंगाली दाखवण्यात आलं असून तर देवचं कुटुंब पारंपरिक हिंदी भाषिक आहे. काहे दिया परदेस मालिकेतील गौरीचं तिच्या कुटुंबावर अपार प्रेम आहे. गौरीच्या कुटुंबात तिचे आई, वडिल, भाऊ, वहिनी आणि प्रेमळ आजी आहे. तर तिकडे सोनाक्षीसुद्धा आपले आई-वडिल, भाऊ आणि आजी यांच्यावर तितकंच प्रेम करते.सुरुवातीला एकमेंकांशी भांडणारे हे कपल अनाहूतपणे एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात याचं दोन्ही मालिकांमधील चित्रणही काहीसं सारखंच असल्याचं भासतं.. एकमेकांच्या प्रेमात असूनही शिव-गौरी किंवा देव-सोनाक्षी ते काही केल्या व्यक्त करु शकत नाही. हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी देव सोनाक्षीला घेऊन बाहेर वॉकला जातो. त्याचवेळी सोनाक्षीला अपघात घडतो. या अपघातानंतर देव आणि सोनाक्षीमध्ये प्रेमांकुर फुलू लागतात. तर दुसरीकडे गौरी आणि शिवची कथाही काहीशी सारखीच.गौरीवर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी शिव तिला बाहेर फिरायला घेऊन जातो. तिथंच गौरीवर असलेलं प्रेम शिव व्यक्त करतो.. या दोन्ही मालिकेतील आणखी एक समानता म्हणजे यातील कपल पहिल्यांदाच मुख्य अशी भूमिका साकारतायत. काहे दिया परदेस मालिकेतील शिवची भूमिका साकारणारा रिषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव या दोघांचीही पहिलीच मोठी भूमिका आहे. तर कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेतील देवची भूमिका साकारणारा शाहिर शेख आणि सोनाक्षीची भूमिका साकारणारी एरिका फर्नांडिस या दोघांचीही ही पहिलीच मोठी भूमिका आहे. याशिवाय या कपलच्या पालकांची भूमिका साकारणारे मराठी कलाकार हा सुद्धा एक समान दुवा म्हणावं लागेल.. काहे दिया परदेस या मालिकेत गौरीच्या आईची भूमिका शुभांगी गोखले तर वडिलांच्या भूमिकेत मोहन जोशी आहेत.. तर कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत देवच्या आईच्या भूमिकेत सुप्रिया पिळगावकर पाहायला मिळतायत.. दोन्ही मालिकांमध्ये दोन्ही कपल्सनी एकमेंकांवरील प्रेम व्यक्त केलं असलं तरी प्रेमापासून लग्नापर्यंतचा पुढील प्रवास तितकाच कठीण असणार आहे. कारण काहे दिया परदेस या मालिकेत गौरीची वहिनी आणि शिवचे आई-वडिल गौरी आणि शिवच्या प्रेमाच्या नात्यात अडथळा आणण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत देवची मामी शिव आणि सोनाक्षीच्या प्रेमाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतेय.दोन्ही मालिकांचं शीर्षक गीतही तितकंच श्रवणीय आणि सुरेल आहे. आजवर या आणि अशा कितीतरी गोष्टी तुम्हालाही या दोन्ही मालिकेत सारख्या वाटल्या असतील. येत्या काळातही दोन्ही मालिकांच्या कथेचा प्लॉट सारखाच भासल्यास आश्चर्य वाटायला नको. याशिवाय छोट्या पडद्यावर आजवर लकी आणि हिट फॉर्म्युला समजण्यात आलेल्या ‘के’ अक्षरापासून या दोन्ही मालिकांच्या शीर्षकाची सुरुवात होते हासुद्धा एक निव्वळ योगायोग म्हणावा लागेल.