Join us

सोना मोहपात्रा झळकणार सारेगमप कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 5:41 PM

गायिका सोना मोहपात्रा ही नामवंत गायिका सारेगमप कार्यक्रमात पदार्पण करीत आहे. तिला या कार्यक्रमाच्या वाजिद खान आणि संगीतकार-गायक-अभिनेता शेखर रावजियानी या नेहमीच्या नामवंत परीक्षकांची साथ मिळेल.

‘झी टीव्ही’ या वाहिनीने आपले ‘आज लिखेंगे कल’ हे ध्येय घोषित करण्यापूर्वीच या कार्यक्रमाने ते अंमलातही आणले होते! ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमाने गेल्या अनेक वर्षांत उभरत्या गायकांच्या पिढ्यांना आपले गायनकौशल्य जनतेसमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच संगीताच्या क्षेत्रात आपली कारकीर्द उभी करण्याची दुर्मिळ संधी दिली होती. सोनू निगम, श्रेया घोषाल, शेखर रावजियानी, कुणाल गांजावाला, संजीवनी, रंजीत रजवाडा, कमाल खान असो की अमानत अली यापैकी प्रत्येक जण संगीताच्या क्षेत्रात आज एक मान्यवर म्हणून प्रस्थापित झालेला असला, तरी ते आपल्या यशाचा पाया हा याच कार्यक्रमात घातला गेल्याचे मान्य करतात. 

गतवर्षीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर ‘झी टीव्ही’ने आता आपला हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. संगीत हे सर्वांसाठी असते म्युझिक से बने हम ही या नव्या आवृत्तीची मध्यवर्ती संकल्पना असून संगीत हीच वैश्विक भाषा असून ती मानवाला एकमेकांशी जोडते आणि विकासाच्या मार्गवर नेते हा विचार त्यातून व्यक्त होतो. यातून सर्वसमावेशकत्वाचा खणखणीत संदेश दिला जात असून धर्म, भाषा, प्रांत, जात, वर्ण तसेंच लिंग यापैकी कसलाही भेद संगीताला मान्य नसून ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम केवळ गुणवत्तेवरच आपले लक्ष केंद्रित करील, हेही त्यातून सूचित होते. ही संकल्पना या कार्यक्रमाच्या ‘हारेगा, हारेगा’ या नव्या जाहिरात मोहिमेत स्पष्ट होते. सारेगमप  हा कार्यक्रम 13 ऑक्टोबरपासून शनिवार-रविवारी रात्री 9.00 वाजता ‘झी टीव्ही’वरून प्रसारित केला जाणार आहे.

बॉलीवूडच्या संगीताला एक उच्च स्थानावर नेण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या तीन नामवंत संगीतकारांची या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमातील स्पर्धक हे भविष्यात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार कसे बनतील, यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्या गायनकलेचा विकास करण्याचे कार्य हे परीक्षक करणार आहेत. या आवृत्तीतून आघाडीची गायिका सोना मोहपात्रा ही नामवंत गायिका रिअॅलिटी कार्यक्रमात पदार्पण करीत आहे. तिला या कार्यक्रमाच्या वाजिद खान आणि संगीतकार-गायक-अभिनेता शेखर रावजियानी या नेहमीच्या नामवंत परीक्षकांची साथ मिळेल. या परीक्षकांखेरीज संगीताच्या प्रत्येक क्षेत्रातील नामवंत अशा 15 ज्यूरींचे एक पॅनल या स्पर्धकांचे ऑडिशनच्या टप्प्यापासून मूल्यमापन करील आणि अंतिम विजेत्याच्या निवडीत परीक्षकांना मदत व सूचना करील. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून पुन्हा एकदा नामवंत गायक आदित्य नारायण काम करणार असून आपल्या खुसखुशीत शेरेबाजीमुळे तो प्रेक्षकांचे मनोरंजनही करीत असतो. या कार्यक्रमाविषयी सोना मोहपात्रा सांगते, “टीव्हीवरील संगीतविषयक रिअॅलिटी कार्यक्रमात एक परीक्षक म्हणून काम करण्याचा श्रीगणेशा मी सा रे ग म प या कार्यक्रमातून करणार असल्याने हा कार्यक्रम मला विशेष जवळचा वाटतो. भारतीय टीव्हीवरील गायनकलेचा शोध घेणारा हा एक प्रतिष्ठेचा कार्यक्रम असून अशा कार्यक्रमाशी मी निगडित असल्याचा मला अभिमान वाटतो. तसंच इतक्या वर्षांनंतर या कार्यक्रमाच्या परीक्षक मंडळाची सदस्य बनणारी मी पहिली महिला ठरले आहे. शिवाय सर्व सामाजिक-सांस्कृतिक भेद दूर सारून संगीतालाच वैश्विक भाषा म्हणून समजणाऱ्या या नव्या आवृत्तीत माझा समावेश होत असल्याबद्दल मला विशेष अभिमान वाटतो.