लहान मुलांमधील अभिनयगुणांचा शोध घेणारा ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ हा कार्यक्रम त्यातील स्पर्धकांच्या अफलातून आविष्काराने आणि या लहान मुलांच्या नाटकीपणामुळे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात बॉलीवूडची नामवंत तारका सोनाक्षी सिन्हा आपल्या “हॅप्पी फिर भाग जाएगी” या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी सहकलाकार जस्सी गिल याच्यासह या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. यावेळी परीक्षक व अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यात बराच काळ गॉसिप सुरू होते आणि त्यांनी बॉलिवूडमधील तारे-तारका तसेच अन्य विषयांवर भरपूर गॉसिपिंग केले.
कार्यक्रमाचा सूत्रसंचालक शंतनू माहेश्वरीने या दोघींच्या गप्पांकडे बघून त्यांना एक प्रश्न विचारला की दोन तारका भेटतात, तेव्हा त्या कोणत्या विषयावर गप्पा मारतात? त्यावर दोघींनी एकच उत्तर दिले- “गॉसिप!” सोनाक्षी म्हणाली, “आम्हा दोघींना गॉसिप करायला खूप आवडतं आणि आम्ही जेव्हा एकत्र भेटतो, तेव्हाही आम्ही आमच्या सहकलाकारांविषयी गप्पा मारीत असतो. ते सेटवर कसे उशिर येतात, तयार होण्यास कसा भरपूर वेळ घेतात, ते त्यांच्या केसांबाबत किती हळवे असतात वगैरे विषयांवर आम्ही गप्पा मारतो. तसंच इतर अशाच विषयांवर आमच्या अखंड गप्पासुरू असतात.” यावेळी सोनाक्षीने हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीम याच्याबद्दल एक छोटासा गौप्यस्फोट केला. ती म्हणाली, “साकिबला आपल्या ‘अॅब्ज’चं प्रदर्शन करायला आवडतं. त्याने अलीकडेच आपलं सरीर पीळदार केलं असून तेव्हापासून तो फक्त याच विषयावर बोलत असतो. त्याचा सोशल मीडियावरील अकाउंटही त्याच्या या पिळदार शरीरयष्टीच्या फोटोंनी भरून वाहात आहे.” हे ऐकताच हुमा कुरेशीला आपले हसू आवरता आले नाही आणि तिनेही या गोष्टीला हसून दुजोरा दिला. याचसंदर्भात सोनाक्षीने आपल्या “हॅप्पी फिर भाग जाएगी” या आगामी चित्रपटातील सहकलाकार जस्सी गिलयाच्याबद्दलही एक हलकीफुलकी टिप्पणी केली. ती म्हणाली, “आम्ही या चित्रपटाच्या चित्रीकरणाला जेव्हा प्रारंभ केला, तेव्हा सुरुवातीचे काही दिवस जस्सी माझ्याशी काही बोलत नसे. पण नंतर मला कळलं की जस्सीला माझ्याशी कसं बोलायचं, याबद्दल संकोच वाटत होता. त्याने मला सांगितलं की आपल्याला कधी चित्रपटात भूमिका मिळेल, अशी त्याची अपेक्षाही केली नव्हती. त्यातच त्याला माझ्याबरोबर भूमिका साकारायला मिळाली, यामुळे तो खूपच धक्क्यात होता. आमच्या चित्रीकरणाच्या पहिल्या श्येड्यूलच्या अखेरच्या दिवशी जस्सी माझ्या व्हॅनिटी व्हॅनजवळ आला आणित्याने माझ्याबरोबर एक छायाचित्र काढण्याची विनंती केली. मला त्याचं हे भाबडं वागणं पाहून खूपच गंमत वाटली.” यानंतर सोनाक्षीने सर्वांना जस्सीबद्दलची एक गोष्ट सांगितली की या चित्रपटाच्या कितीतरी आधीपासून जस्सी हा माझा चाहता बनला होता. यावेळी तिने एक प्रसंग सांगितला, “आम्ही जेव्हा एकत्र चित्रीकरणाला प्रारंभ केला, तेव्हापासून मी जस्सीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याला फॉलो करण्यास सुरूवात केली. पण तेव्हा त्याने मला तब्बल दोन वर्षांपूर्वीपासून जितके संदेश पाठविले होते, ते सर्व माझ्या अकाऊंटवर आले. त्यात त्याने माझ्या कामाची प्रशंसा केली होती आणि मीआपल्या व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी किती मेहनत घेते, त्याबद्दल माझी स्तुती केली होती. तो एक उत्तम सहकलाकार तर आहेच, पण एक चांगला माणूसही आहे.” हुमा आणि सोनाक्षी एकत्र आल्यावर सेटवर धमाल होणे अपेक्षितच होते आणि ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’मध्ये त्यांच्यातील खेळकर आणि मौजमस्तीचे नाते पाहण्यासारखे होते.