मराठीत लोकप्रिय ठरलेल्या मोजक्या विनोदी अभिनेत्यांमध्ये प्रदीप पटवर्धन (pradeep patwardhan) यांचे नाव आवर्जून घेतले जाते. 'मोरूची मावशी’ या नाटकाचे त्यांनी दोन हजारांहून अधिक प्रयोग केले होते. मराठी रंगभूमीवर अनेक दशकं हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरूची मावशी’ या नाटकातली प्रदीप पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती. आत्तापर्यंत अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिका यांमध्ये उल्लेखनीय भूमिका त्यांनी साकारल्या. काही दिवसांपूर्वीच प्रदीप पटवर्धन यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं असं अचानक निधन होणं हा साऱ्यांसाठीच फार मोठा धक्का होता. त्यांच्या जाण्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून त्यांना जय जय महाराष्ट्र माझा - कोळीगीत स्पेशल' या भागातून मानवंदना दिली जाणार आहे.
सोनी मराठी वाहिनीवर 'जय जय महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाअंतर्गत दाखवण्यात आलेल्या दोन भागांचं प्रसारण पुन्हा करण्यात येणार आहे. कारण या कार्यक्रमाचे हे दोन भाग प्रदीप पटवर्धन यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.
या कोळीगीत स्पेशल भागात अभिनेते विजय पाटकर यांच्याबरोबरच्या कोळीनृत्याची झलक पाहणं रंजक ठरणार आहे. शिवाय त्यांच्या अभिनयाचा मनोरंजन क्षेत्रावर असलेला ठसा पाहणं ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरणार आहे.