सीआयडी ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील एसपी प्रद्युमन, दया, अभिजीत या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. पण आता या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवटचा भाग 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सीआयडी ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या मालिकेचे आजवर 1550 भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. ही मालिका संपणार असल्याची बातमी नुकतीच आली आहे. पण ही मालिका संपणार नसून केवळ काही महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याचे सोनी वाहिनीने स्पष्ट केले आहे. सोनी वाहिनीने सीआयडी या मालिकेशी संबंधित एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सोनी वाहिनीवर सर्वात जास्त वर्षं प्रक्षेपित झालेली सीआयडी ही मालिका आहे. या मालिकेने 20 वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजवरचा फायरवर्कस प्रोडक्शन सोबतचा आमचा प्रवास खूपच चांगला होता. सीआयडी ही मालिका 28 ऑक्टोबर नंतर काही महिन्यांच्या ब्रेकवर जाणार आहे. या मालिकेचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आजवर प्रेक्षकांनी पाहिलेल्या भागांपेक्षा अधिक थ्रिलिंग भाग प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये आणखी गुंतागुंतीचे केसेस दाखवले जाणार आहेत.
सीआयडी या मालिकेचा लिम्का बुक रेकॉर्डमध्येही समावेश झाला होता. ही मालिका आजवर सगळ्यात जास्त वर्षं टिव्हीवर प्रक्षेपित झालेली मालिका असून या मालिकेचे निर्माते बी.पी.सिंह आहेत. तसेच या मालिकेत दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव, दिनेश फडणीस, नरेंद्र गुप्ता, श्रद्धा मुसळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील कुछ तो गडबड है, दया तोड दो दरवाजा यांसारखे संवाद प्रचंड गाजले आहेत.