Join us

प्रेक्षकांच्या प्रेमाची ‘झिंग’ चढलीय-स्पृहा जोशी

By अबोली कुलकर्णी | Published: August 11, 2018 6:32 PM

स्पृहा जोशी हिने ‘सूर नवा ध्यास नवा-छोटे सूरवीर’ या कलर्स मराठीवरील सांगितीक कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वासह सुत्रसंचालक म्हणून एक नवी ओळख निर्माण केली आहे.

मराठी इंडस्ट्रीसोबतच कवितेच्या जगतात सहज रममाण होणारी एक गुणी अभिनेत्री आणि कवयित्री म्हणजे स्पृहा जोशी. कवितेच्या माध्यमातून गंभीरपणे संवेदनशील मुद्दे तिने हाताळले तसेच तिने एक उदयोन्मुख कवयित्री म्हणून देखील ओळख मिळवली. ‘मोरया’ चित्रपटापासून तिने करिअरला सुरूवात केली. त्यानंतर तिने ‘देवा’, ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड’, ‘अँण्ड जरा हटके’ यासारख्या अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या. आता तिने ‘सूर नवा ध्यास नवा-छोटे सूरवीर’ या कलर्स मराठीवरील सांगितीक कार्यक्रमाच्या दुसऱ्या  पर्वासह सुत्रसंचालक म्हणून एक नवी ओळख निर्माण केली आहे. या शोद्दल आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी तिच्याशी केलेली ही बातचीत...  * ‘सूर नवा ध्यास नवा-छोटे सूरवीर’ या कार्यक्रमात तू सूत्रसंचालक म्हणून दिसते आहेस. कसा होता आॅडिशन्सचा अनुभव?- खूप छान. खरंतर खूप धम्माल, मस्ती करतेय मी मुलांसोबत. आम्ही मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर याठिकाणी आम्ही आॅडिशन्स केली आहेत. मुलांसोबत धम्माल करायला मला खूप आवडते. आता त्यांच्यासाठी मी सुत्रसंचालकापेक्षा त्यांची ‘ताई’ झाले आहे. मला असं वाटतं की, त्यांच्या माझ्यासोबतचा हा  ‘क नेक्ट’ जास्त महत्त्वाचा वाटतोय. ते आता बिनधास्तपणे माझ्याशी संवाद साधत आहेत. 

 * ६ ते १५ वयोगटातील मुले यात असणार आहेत. काय खास तयारी केली होतीस तू यांच्यासाठी? तू कविता देखील करतेस, याचा काही फायदा होईल का सूत्रसंचालनात?- मी कुठलीही खास तयारी केली नाही. कारण लहान मुलं हे इतके  निरागस आणि हजरजबाबी असतात की, त्यामुळे मला त्यांच्या मुडनुसारच परिस्थिती सांभाळावी लागणार आहे. माझ्यासाठी ही जबाबदारी आहे. आमची टीम देखील खूप सांभाळून घेणारी आहे. त्यामुळे नक्कीच बरंच काही शिकायलाही मिळेल. त्याशिवाय मी कविता करते त्याचा मला नक्कीच फायदा होईल, कारण कुठलीही कला वाया जात नाही. त्याचा काही ना काही उपयोग हा होतोच.  * तूझ्याकडे जेव्हा या शोची आॅफर आली तेव्हा तुझी रिअ‍ॅक्शन काय होती?- खूप आनंद झाला. ही मोठी जबाबदारी आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या सांगितीक शोचे पहिले पर्व खूप गाजले आहे. त्यामुळे आता ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर आहे. सूत्रसंचालनासाठी ‘कलर्स मराठी’ला माझा विचार करावा वाटला, यातच माझा एक कलाकार म्हणून सन्मान आहे.

* ‘सूर नवा ध्यास नवा’ हे पहिल्या पर्वासाठी तेजश्री प्रधान हिने सूत्रसंचालक म्हणून काम पाहिले होते. काही दडपण आहे का?- दडपण बिल्कुलच नाहीये. कारण माझी सूत्रसंचालनाची शैली वेगळी आहे. तेजश्रीची स्टाईल वेगळी होती. दोन्ही पर्व वेगळे आहेत. पहिले पर्व कसलेल्या गायकांचे होते आणि हे पर्व छोटया मुलांचे आहे. त्यामुळे चॅलेंजिंग आहे. नक्कीच मला खात्री आहे की, या लहान मुलांसोबत मी हे पर्व एन्जॉय करेन.

 * महेश काळे, अवधूत गुप्ते आणि शाल्मली खोलगडे हेच कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत. कशी आहे यांच्यासोबतची रिअल लाइफमधील तुझी बाँण्डिंग?- खूप मस्त. शाल्मली आणि महेश यांच्यासोबत मी प्रथमच भेटले आहे. अवधूतसोबत तर मी ‘मोरया’ नावाचा माझा पहिला चित्रपट केला होता. त्यामुळे आमची बाँण्डिंग खूप चांगली आहे. आता भेटी वाढतील आणि आमची मैत्री आणखी वाढणार, यात काही शंका नाही.

 * तुझे कार्यक्रमासाठीचे कॉस्च्युम्स काही वेगळे डिझाइन केले आहेत का? खूप वेगळी दिसतेस तू यात?- होय, माझा लूक आणि कॉस्च्युम्स यांच्यावर काम झाले आहे. सौरभ जैन म्हणून माझा स्टायलिस्ट आहे त्याने माझ्या स्टाईलवर काम करतो आहे. तर आता नेहा चौधरी ही देखील माझ्या लूक्सवर काम करतेय. लहान मुलांचे पर्व असल्याने मी त्यांना त्यांच्या जवळची वाटली पाहिजे. माझ्या कॉस्च्युममुळे ते दबून राहायला नको, असा आमच्या संपूर्ण टीमचा प्रयत्न असणार आहे. 

 * तू शाळेत असतानापासूनच नाटक, जाहीराती यांच्यामध्ये काम केलं आहेस. कसं वाटतं मागे वळून बघताना?- खूप छान वाटतं. या काळात बरंच काही शिकायला मिळालं. असं वाटतं की, हे सगळं केव्हा झालं? आत्ता तर आपण पहिली मालिका, नाटक केलं होतं. पण, सर्व गोष्टी नव्या करताना जे थ्रिल आणि आनंद मिळतो, तो अवर्णनीय असतो.

 * तुझी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधील कुहूची व्यक्तिरेखा आणि ‘उंच माझा झोका’ मधील रमाबाई रानडे यांच्या भूमिका खूप गाजल्या. कसं वाटतं जेव्हा प्रेक्षकांकडून एवढं प्रेम मिळतं?- नक्कीच, खूप छान वाटतं. असं म्हणायला हरकत नाही की, या प्रेक्षकांच्या प्रेमासाठीच सगळं काही सुरू आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाची सवय लागलीय. मी आशा ठेवते की, यापुढेही मला असेच प्रेम  मिळत राहील. 

* २०१७ मध्ये तू ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा सिनेमा केला होतास आणि ‘प्रेम हे’ मालिकेतही तू २०१७ मध्येच दिसली होतीस. त्यानंतर आता पुन्हा चित्रपटात केव्हा दिसणार?- २८ सप्टेंबर रोजी माझा ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तेव्हा मी लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आत्तापर्यंत जसे प्रेक्षकांचे प्रेम मिळाले तसेच यापुढेही मिळावे, अशी अपेक्षा ठेवते.

टॅग्स :सूर नवा ध्यास नवास्पृहा जोशी