सध्या कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. अलिकडेच प्रसिद्ध अभिनेत्री श्रीजिता डे हिनेदेखील पतीबरोबर बंगाली पद्धतीने लग्न केलं. श्रीजिताने २०२३ मध्ये बॉयफ्रेंड मायकल ब्लोहम पेपबरोबर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तिने पुन्हा बंगाली पद्धतीने लग्न केलं. याचे फोटो तिने शेअर केले होते.
श्रीजिताने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली. पण, एका गोष्टीमुळे मात्र तिला ट्रोल केलं गेलं होतं. श्रीजिताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने लाल रंगाच्या साडीत बंगाली लूक केला होता. तर तिच्या पतीने शेरवानी घातली होती. मात्र लग्नात सात फेरे घेताना तिच्या पतीने पायात बूट घातले होते. त्यामुळे चाहते नाराज झाले होते. या फोटोंवर कमेंट करत अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रीजिताने भाष्य केलं आहे.
फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत श्रीजिता म्हणाली, "जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा चप्पल बाहेर काढतो. पण, चर्चमध्ये जातो तेव्हा चप्पल काढत नाही. देव दोन्ही ठिकाणी आहे. अग्नी आणि सात फेरे याबाबत मनात आदर असला पाहिजे. कपडे आणि बूट यांवरुन आदर दिसत नाही. बंगाली वेडिंगमध्ये शेरवानीही घातली जात नाही. धोतर नेसलं जातं. संस्कृतीचा आदर कपड्यांवरुन दाखवला जाऊ शकत नाही". अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतरही तिला ट्रोल केलं जात आहे.