सुपर डान्सर २ मध्ये परीक्षकांनी ताज्या केल्या श्रीदेवी यांच्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 8:01 AM
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर २ मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. ...
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर २ मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. देशभरातील अतिशय प्रतिभावान स्पर्धकांमुळे स्पर्धेने वेगळीच पातळी गाठली आहे. या कार्यक्रमाचा प्रवास आता उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे कोणते स्पर्धक बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमात नुकतीच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना आदरांजली वाहाण्यात आली. श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूडसोबतच त्यांच्या फॅन्सना देखील चांगलीच धक्का बसला आहे. सुपर डान्सर या कार्यक्रमातील स्पर्धक शगुन सिंहने श्रीदेवी यांच्या एका प्रसिद्ध गाण्यावर नुकतेच नृत्य सादर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शगुनचे नृत्य पाहून या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणाऱ्या शिल्पा शेट्टी कुंद्राचे डोळे पाणावले. श्रीदेवी आणि शिल्पा शेट्टी यांचे खऱ्या आयुष्यात नाते खूपच चांगले होते. शिल्पाने यावेळी श्रीदेवी यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. शगुनच्या नृत्यावर बोलण्याच्या किंवा टिप्पणी करण्याच्या मनःस्थितीत शिल्पा नव्हती. कारण श्रीदेवी यांचा उल्लेख ती भूतकाळात करूच शकत नव्हती.सुपर डान्सर या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला बागी २ मधील टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी देखील उपस्थित होते. हे त्यांच्या बागी २ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. श्रीदेवी यांच्या आठवणीने त्यांना देखील भरून आले. त्यांनी देखील या महान अभिनेत्रीला आदरांजली वाहिली. अनुराग बासू देखील या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहे. तो देखील श्रीदेवी यांचा खूप चांगला मित्र होता. त्याने सांगितले की, श्रीदेवी या खूप चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच त्या खूप चांगल्या चित्रकार होत्या. पण त्यांनी आपले हे कौशल्य कधीच लोकांसमोर येऊ दिले नाही.सुपर डान्सर या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमांच्या यंदाच्या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या सिझनमधील चिमुकले प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमात गीता कपूर देखील परीक्षकाच्या भूमिकेत आहे. Also Read : गणेश आचार्यने एकावेळी खालल्या होत्या २०० इडल्या