जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मातेचे मंदिर हे त्या राज्यातील सर्वात पवित्र तीर्थस्थळ असून हे मंदिर आदिशक्ती या देवतेचे आहे. हे मंदिर जम्मूतील पर्वतांवर वसले असल्याने ‘स्टार भारत’वरील ‘जग जननी माँ वैष्णोदेवी’ या आगामी मालिकेचे चित्रीकरण याच मंदिराच्या परिसरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘स्टार भारत’ वाहिनीने आजवर अनेक पौराणिक मालिकांचे यशस्वीरीत्या प्रसारण केले आहे. यापूर्वी या वाहिनीवर देवों के देव- महादेव या मालिकेचे प्रसारण करण्यात आले होते आणि सध्या राधाकृष्ण ही मालिका सुरू आहे. या सर्व मालिकांनी उदंड लोकप्रियता प्राप्त केली होती. आता वैष्णोदेवीवरील मालिकेसाठी कलाकारांची निवड निश्चित करण्यात आली असून सप्टेंबरपासून या मालिकेचे प्रसारण केले जाईल.
‘जग जननी माँ वैष्णोदेवी’ या मालिकेची कथा वैष्णोदेवीच्या जन्मकथेवर आधारित असून असुरांनी सुरू केलेल्या अत्याचारांपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी तिचा जन्म कसा झाला, ते यात दाखविण्यात येईल.
जम्मू-काश्मीरच्या हिमालयातील पर्वतांवर स्थित वैष्णोदेवीच्या मंदिर परिसरात आपल्या आवडत्या कलाकारांना चित्रीकरण करताना पाहून मातेच्या भक्तांमध्ये नक्कीच उत्साहाची लाट येईल.