राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने पंधरा दिवसांसाठी का होईना मालिका-चित्रपटांच्या चित्रीकरणासह चित्रपटगृहांनाही पुन्हा एकदा टाळे लागले आहे. यामुळे एकीकडे मोठे चित्रपट प्रदर्शनापासून रखडले आहेत, तर दुसरीकडे अनेक मोठय़ा चित्रपटांचे चित्रीकरण आणि अन्य तयारीही थांबली आहे.अशात मालिकांनी आता मुंबई बाहेर जात त्यांचे चित्रिकरण सुरु ठेवले आहे. यात स्टार प्रवाह चॅनेलच्या सुपरहिट मालिकांचा समावेश आहे. रसिकांचे मनोरंजन करण्यात ब्रेक लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, स्वाभिमान यासारख्या बहुतांश मालिका सध्या रंजक वळणावर आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनोरंजनात कुठलाही व्यत्यय येऊ नये, याची काळजी स्टार प्रवाह चॅनलकडून घेण्यात आली आहे. यात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं चित्रीकरण गोव्यात होणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेची टीमही चित्रीकरणासाठी गोव्यात स्थंलांतरीत होईल.
तर ‘आई कुठे काय करते’, ‘स्वाभिमान’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘मुलगी झाली हो’, ‘सांग तू आहेस का’ या मालिकांचे चित्रीकरण सिल्वासा येथे करण्यात येणार आहे.तर ‘फुलाला सुंगध मातीचा’ या मालिकेची टीम गुजरातला रवाना झाली असून या मालिकेचं चित्रीकरण अहमदाबाद येथे सुरु करण्यात आलय.
कोविडसंदर्भातील सगळ्या नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्यात येत आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये चित्रीकरणाची परवानगी आहे आणि जिथे चित्रीकरण होऊ शकतील अशाच ठिकाणी चित्रीकरण करण्यात येत आहे. नियमानुसार सगळ्या कलाकारांच्या कोविड टेस्ट करण्यात आली असून महाराष्ट्राबाहेर नेण्यात येतय.