Tu Hi Re Mazha Mitwa: सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच स्टार प्रवाहवर 'आई बाबा रिटायर होत आहेत!' ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ, मंगेश कदम तसेच हरिश दुधाडे आणि प्रतिक्षा जाधव यांसारख्या कलाकारांची फळी पाहायला मिळते आहे. त्यानंतर आता स्टार प्रवाह वाहिनीने आणखी दोन नव्या मालिकांची घोषणा केली. अलिकडेच 'लग्नानंतर होईलच प्रेम' आणि 'तू ही रे माझा मितवा' या मालिकांचे प्रोमो समोर आले. या आगामी मालिकांची स्टोरी आणि त्यातील स्टारकास्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अशातच सोशल मीडियावर अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर यांची प्रमुख भूमिका असलेली 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
स्टार प्रवाहवरील या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे. या मालिकेसाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. २३ डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्री १०.३० वाजता ही 'तू ही रे माझा मितवा' ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, सुरूवातीला ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे त्यातून वाट काढत ईश्वरी कशाचीही पर्वा न करता गाड्यांवरून उड्या मारत जाते. त्यावेळी आजुबाजूचे लोक तू चाललीस कुठं? म्हणत तिच्यावर ओरडतात. तेव्हा ईश्वरी त्यांना आपल्या हातातील अस्थमाचा पंप दाखवत इमर्जन्सी असल्याचं सांगते. याचदरम्यान चालत जात असताना पुढे ती नेमकी अर्णवच्या गाडीवर जाऊन धपकन पडते. तोल गेल्यामुळे ईश्वरीच्या हातातील हेल्मेट गाडीच्या काचेवर पडून काच फुटते. तेव्हा अर्णव गाडीतून बाहेर येतो. समोर आपल्या बॉसला पाहून ती घाबरून जाते. या प्रकारामुळे अर्णव तिच्यावर रागावतो. त्यावर अर्णवलाही ती इमर्जन्सी असल्याचं सांगते. असं असतानाही अर्णव ईश्वरीवर ओरडतो आणि तिला म्हणतो, "माझ्या गाडीचं नुकसान केलंस तू या काचेची किंमत तुला माहीती आहे का? त्यावर उत्तर देताना ईश्वरी म्हणते, "एखाद्याच्या जीवापेक्षा कमी असेल ना सर. हवं तर मी नुकसान भरून देते. बोला पैसे."
ईश्वरीचं उत्तर ऐकून अर्णव म्हणतो, "मग ५० हजार टाक." गाडीच्या काचेची ५० हजार किंमत ऐकून ईश्वरीला चेहऱ्यावरचा रंग उडतो. त्यावर अर्णव म्हणतो,"शक्य नाही ना? लायकी नसताना बोलायचं नाही, कळलं." मग ईश्वरी म्हणते, "सॉरी सर आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. पण मी देणार, नक्की देणार." तेवढ्यात अर्णवला ईश्वरीचं लॉकेट त्याच्या गाडीवर पडलेलं दिसतं. ते तो उचलतो आणि तिला म्हणतो, "आधी पैसे द्यायचे. मग लॉकेट घेऊन जायचं. अर्णवला प्रत्युत्तर देत ईश्वरी म्हणते, "देईनच! हम इंदौरसे है उधार देते भी नही, और रखते भी नही." असा या मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहायला मिळतो आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.