महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध लादले आहेत. त्यानुसार काही दिवस मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणाला बंदी आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयानंतर अनेक हिंदी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या बाहेर करण्यात येत आहे. त्याचसोबत आता स्टार प्रवाह या मालिकेवरील प्रसिद्ध मालिका फुलाला सुगंध मातीचा या मालिकेचे चित्रीकरण देखील परराज्यात केले जाणार आहे.
‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमधील अभिनेत्री नम्रता केळकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मालिकेची पूर्ण टीम मुंबई एअरपोर्टवर दिसून येत आहे आणि दुसऱ्या एका पोस्टमध्ये विमान उड्डाणासाठी तयार असून त्याचसोबत बाय बाय असं कॅप्शन तिने लिहिले आहे. यावरूनच ही टीम शूटिंगसाठी दुसऱ्या राज्यात गेल्याचा अंदाज लावला जात आहे.
महाराष्ट्रात चित्रीकरणास बंदी घातल्यानंतर अनेक मालिकांचे चित्रीकरण सध्या हैद्राबादमधील रामोजी सिटी येथे होत आहे.
मुलीच्या जन्माप्रमाणेच तिचं शिक्षण हा देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे. या मालिकेत समृद्धी केळकर, हर्षद आतकरी, आदिती देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.