असे म्हणतात की, खरा हिरो त्याच्या किंवा तिच्या शारीरिक ताकदीवरून ठरत नाही तर, हृदयातल्या, मनातल्या ताकदीवरून खरा हिरो ओळखला जातो. शिवानी ही आपल्यातल्या अशाच काही सूपरहिरोंपैकी एक आहे. सोनी सब वाहिनीवरील आगामी “सुपर सिस्टर्स’’ ही मालिका अशाच दोन अद्वितीय बहिणींमधल्या प्रेमाची कथा सांगते. या कथेत प्रचंड चढ-उतारांनी भरलेल्या त्यांच्या आयुष्यात एक रहस्य दडलेले आहे. सुपर सिस्टर्स ही मालिका ६ ऑगस्टपासून सोनी सब वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
सुपर सिस्टर्स या मालिकेत शिवानी आणि सिद्धी या दोन बहिणींमधले अत्यंत संवेदनशील नाते दाखवण्यात आले आहे. शिवानी हे पात्र वैशाली ठक्कर साकारत असून ती खूपच प्रेमळ, निरागस पण तरीही खूपच शूर मुलगी आहे. मोठी बहीण असल्यामुळे, तिचे वागणे अधिक जबाबदार असून आपली धाकटी बहीण सिद्धी (मुस्कान बामणे) हिच्याकडे ती नेहमीच प्रोटेक्टिव्ह म्हणजे काळजीपूर्ण दृष्टीने पाहते. दुसरीकडे, सिद्धी मात्र खूपच तापट आणि टॉम बॉयसारखी राहणारी व वागणारी मुलगी आहे. लहानपणीच या दोघींचे पालक देवाघरी गेले असल्याने या दोघी बहिणीच प्रत्येक बाबतीत एकमेकींचा आधार बनल्या आहेत. अश्मित ओबेरॉय (गौरव वाधवा) याच्या रुपाने शिवानीच्या आयुष्यात प्रेमाची भावना प्रवेश करते. अश्मित हा एक तरुण व्यापारी असतो. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. एकमेकांना समजून घेण्याच्या, एकमेकांसोबत वेळ घालवण्याच्या अनेक संधी मिळूनही शिवानी मात्र प्रत्येक वेळी या संधी टाळत राहते. तिला प्रेमात पडण्यापासून परावृत्त करणारे तिच्या आयुष्यातले एक गुपित तिला असे वागायला भाग पाडते. या दोघी बहिणी आपल्या वाढत्या वयात आपले काका म्हणजेच विजय बदलानी यांच्याकडे राहिलेल्या असतात. चाचा अतिशय प्रेमळ असतात. परंतु आता, एका ठराविक रहस्यमय व गूढ परिस्थितीमुळे या दोघी गुरगावला आपल्या मामाकडे (कृणाल पंडीत) रहायला येतात. या मुलींच्या कपटी मामीची भूमिका मानिनी डे मिश्रा हिने साकारली असूनइशा आनंद शर्मा हिने या मुलींच्या मामेबहिणीची भूमिका वठवली आहे. मामी आणि मामेबहीण दोघीही या मुलींना फार त्रास देतात, त्यांच्यात भेदभाव करतात. तर, सुपर सिस्टर्सचे आयुष्य हे असे आहे. नशिबाने त्यांना नेहमीच त्यांचा आनंद आणि गरज या दोनपैकी एकाच गोष्टीची निवड करण्याची संधी दिली आहे आणि जेव्हा-जेव्हा त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांना हवीहवीशी असते, तेव्हाच काहीतरी पेच उभा राहतो.