आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांचा 'होम मिनिस्टर' (Home Minister) हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. महाराष्ट्रातील तमाम महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘होम मिनिस्टर’ला ओळखले जाते. ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत सुरु झालेला ‘होम मिनिस्टर’नं महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभरातील वहिनींचा सन्मान करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं आहे. पैठणीला ग्लॅमर मिळवून देण्याचं काम होम मिनिस्टर या कार्यक्रमाने केलं आहे. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात जिंकणाऱ्या महिलेला पैठणीच का दिली जाते, याचा खुलासा आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी केला आहे.
सुचित्रा बांदेकर यांनी नुकतेच सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलताना सुचित्रा यांनी पती आदेश बांदेकर यांच्या 'होम मिनिस्टर' कार्यक्रमातील पैठणीमागील किस्सा सांगितला. सुचित्रा म्हणाल्या, 'खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा फार पैसे हातात नसायचे. आमच्या सोसायटीमधील सर्व बायकांनी ठरवलं होतं की, पैठणी विकत घ्यायची आणि तेव्हा आदेशचा 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम नव्हता. आदेशच्या या कार्यक्रमाला आता २० वर्षे झाली. त्याआधीची ही गोष्ट आहे'.
पुढे सुचित्रा म्हणाल्या, 'त्यावेळी आम्ही सगळ्याजणी पैसे काढायचो आणि जिचा नंबर लागेल तिला ती पैठणी मिळायची. lतर असं पैठणीची भिशी आम्ही काढायचो आणि ही गोष्ट आदेशाला मी सांगितली. तेव्हा तो म्हणाला तुमच्यासाठी इतकी पैठणी महत्त्वाची आहे. हे त्याला जेव्हा कळलं, त्यानंतर तो झी वाहिनीशी बोलला आणि त्यानं भेटवस्तू म्हणून या कार्यक्रमात पैठणी द्यायला सुरुवात केली. ज्या स्त्रियांसाठी पंधरा ते वीस हजाराची पैठणी घेणं कठीण असतं, त्यासाठी त्यानं हा नवा उपक्रम सुरु केला. तर पैठणी देण्याचं क्रेडिट हे पूर्णतः माझं आहे'.
मराठी मनोरंजन सृष्टीतील आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर ही लोकप्रिय जोडी आहे. या दोन्ही कलाकारांनी कलाविश्वात आपली छाप पाडून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. आदेश बांदेकर हे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचले आहेत. तर सुचित्रा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. नुकतेच त्यांचा 'बाई पण भारी देवा बाई पण भारी ग' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. दोघांनी त्यांच्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांची लव्ह स्टोरी खूप हिट आहे. त्यांचे प्रेमाचे किस्सेही चर्चेत असतात.
'होम मिनिस्टर' कार्यक्रमाबद्दल बोलायचे झालं तर या कार्यक्रमात अगदी उच्चभ्रू कुटुंबापासून ते सर्वसामान्य कुटुंब सहभागी झाले आहेत. हजारो एपिसोड, हजारो पैठण्या, कित्येक आठवडे, लाखो माणसं आणि आयुष्यभराच्या आठवणी असा हा प्रवास 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी केला आहे. आदेश बांदेकर हे ‘भावोजी’ म्हणून घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमाने मोठा पल्ला गाठला आहे.