सुबोधचा आज म्हणजेच ९ नोव्हेंबरला वाढदिवस असून १९७५ ला पुण्यात त्याचा जन्म झाला. त्याने त्याचे शिक्षण पुण्यातील सिम्बोसिस कॉलेजमधून पूर्ण केले आहे. त्याने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी एका आयटी कंपनीत सेल्समनचे काम देखील केले होते.
सुबोध भावेने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सुबोधने कॉलेज जीवनापासूनच एकांकिकामध्ये काम करायला सुरुवात केली. त्याला त्यावेळी अनेक पारितोषिकं मिळाली होती. त्याने अभिनय करण्यासोबतच दिग्दर्शन देखील केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेला कट्यार काळजात घुसली हा चित्रपट चांगलाच गाजला होता. सध्या त्याची तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेत गायत्री दातार आपल्याला त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या कथानकानुसार नायक आणि नायिकेत खूप वर्षांचे अंतर आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात देखील सुबोध हा गायत्रीपेक्षा खूपच मोठा आहे. एवढेच नव्हे तर गायत्री केवळ तिसरी-चौथीत असताना सुबोध हा प्रसिद्ध अभिनेता होता आणि तिला त्याच्या हातून एक बक्षिस मिळाले होते. त्यावेळीच गायत्रीने सुबोधसोबत काम करण्याची इच्छा बोलवून दाखवली होती. त्यावेळी तू शिकून मोठी हो, मन लावून अभ्यास कर आणि मग या क्षेत्रात ये असे सुबोधने तिला सांगितले होते. सुबोधसोबत काम करण्याची गायत्रीची इच्छा तुला पाहते रे या मालिकेमुळे पूर्ण झाली आहे.
सुबोध भावने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत गायत्रीच्या लहानपणाच्या आठवणीविषयी सांगितले होते. त्याने फोटोसोबत एक कॅप्शन देखील लिहिले होती, ''दुनिया गोल है' काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये एका लहान मुलीला माझ्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ती म्हणाली होती की मला पण तुमच्याबरोबर काम करायचं, मी म्हणालो नक्की आणि अचानक एक दिवशी 'तुला पाहते रे'च्या सेटवर तिची गाठ पडली.'' असे त्याने लिहिले होते. मात्र काही वेळातच सुबोधने हा फोटो डिलीट मारला होता.