लहानपणी 'व्यापार' हा गेम आपण सगळेच खेळलो आहोत. याच थीम वर आधारित एक खास गिफ्ट अभिनेता सुबोध भावेला मिळाले आहे. सुबोधच्या चाहत्यांनी त्याच्या मोजक्या चित्रपटांचा व्यापार हे खेळ बनवून त्याला पाठवला आहे. याचा व्हिडिओ सुबोधने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Subodh Bhave Birthday Gift)
अभिनेता सुबोध भावेचा वाढदिवस ९ नोव्हेंबर रोजी असतो. यानिमित्त दरवर्षीच चाहते त्याला काही ना काही भन्नाट भेटवस्तु देत असतात. अशाच एका चाहत्याने लहानपणी आपण खेळलेला व्यापार हा गेम पाठवला आहे. पण हा गेम वेगळा आहे कारण यामध्ये सुबोधच्या आत्तापर्यंतच्या कलेच्या प्रवासातले टप्पे निवडून हा खेळ बनवलाय. त्यात सुबोधने काम केलेले विविध चित्रपट, मालिका आणि नाटकं आहेत. सुचित्र चित्रपट असे खेळाला नाव दिले आहे.यासोबत सोंगट्या, गेम कार्ड्स, पैसे आणि खेळाचे नियम असं सगळं पाठवलं आहे. हे अफलातुन गिफ्ट बघून सुबोध भावे खरोखर नि:शब्द झाला आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच चाहत्यांनी एक छोटी पत्रपेटी पाठवली आहे ज्यात अनेक पत्र आहेत.
सुबोध भावे हा मराठीतील अतिशय उत्कृष्ट अभिनेता आहे. चित्रपट असो, नाटक असो किंवा मालिका त्याने प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम केले आहे. 'बालगंधर्व' चित्रपटातील त्याची भुमिका कधीही न विसरता येणारी आहे. सुबोधने पडद्यावर साकारलेले काशिनाथ घाणेकर प्रत्येकाच्याच लक्षात आहेत. तर 'अवघाचि संसार', 'अवंतिका', 'वादळवाट' यासारख्या अनेक मालिकांमधून सुबोध घराघरात पोहोचला आहे. याचाच आधार घेत चाहत्यांनी दिलेले हे गिफ्ट सुबोधच्या कायम स्मरणात राहण्यासारखे आहे. सुबोधचा नुकताच 'हर हर महादेव' हा सिनेमा प्रदर्शित झालाय.