Join us

"...आयुष्यात पुन्हा कधीच वटपौर्णिमा करू नकोस", लग्नानंतर सुचित्रा बांदेकरांना असं का म्हणाल्या सासूबाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 17:56 IST

लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी आदेश बांदेकरांच्या आईने सुचित्रा यांना कडक उपवास करण्यास सांगितलं होतं. हा किस्सा सुचित्रा बांदेकर यांनी सांगितला.

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे.  त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. आदेश आणि सुचित्रा बांदेकर अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेच्या निमित्ताने बांदेकर कुटुंबीयांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी सुचित्रा बांदेकर यांनी लग्नानंतरच्या पहिल्याच वटपौर्णिमेचा किस्सा सांगितला. 

लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी आदेश बांदेकरांच्या आईने सुचित्रा यांना कडक उपवास करण्यास सांगितलं होतं. हा किस्सा सांगत सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आमचं लग्न झालं तेव्हा मी फक्त १९ वर्षांची होते. लग्नानंतर लगेचच वटपौर्णिमेचा सण आला होता. आदेशच्या आईने मला सांगितलं होतं की कडक उपवास करायचा. पाणीही प्यायचं नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. मी सकाळी उठले तेव्हा त्यांनी मला सगळ्यात आधी अंघोळ करायला सांगितली. माझ्या सासूबाई देखील वर्किंग वुमन होत्या. अंघोळ केल्यानंतर त्यांनी मला सुगड पुजायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला सासरे आणि आदेशला वाण द्यायला सांगितलं. सगळ्यांना नमस्कार करायला सांगितलं." 

पुढे त्या म्हणाल्या, "हे सगळं झाल्यानंतर त्या मला म्हणाल्या की आता जेवून घे. पोटभर खाऊन घे. आणि आता आयुष्यात पुन्हा कधीच वटपौर्णिमा केली नाहीस तरी चालेल. माझ्यासाठी तो अनुभव एकदम अफलातून होता. विसरता न येणारी अशी ही गोष्ट आहे." यावर आदेश बांदेकर म्हणाले, "माझी आई नर्स होती. त्यामुळे आताच्या पिढीला काय कळणार, असं आपल्याला वाटतं. पण, दोन्ही पिढींमधला समन्वय साधला गेला पाहिजे, ही त्यामागची तिची भावना होती. वटपौर्णिमेची पूजा तर केली पाहिजे. पण, त्यामागचं सार समजून घ्या आणि कामाला लागा. तुम्हाला या स्पर्धेत धावायचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने ते करा, अशी तिची धारणा होती. ती खूप ग्रेट होती." 

दरम्यान, अभिनयाबरोबरच बांदेकर कुटुंबीय निर्मिती क्षेत्रातही कार्यरत आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेची निर्मितीची बाजू ते सांभाळत आहेत. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरही अभिनय क्षेत्रात करिअर करत आहे. 

टॅग्स :आदेश बांदेकरटिव्ही कलाकार