सासू-सुनेच्या मालिकांमध्ये खाश्ट सासूची भूमिका साकारत त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुधा चंद्रन यांच्याबद्दल कोणत्याही परिचयाची गरज नाही. 27 सप्टेंबर 1965 रोजी मुंबईत जन्मलेली सुधा त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखल्या जातात. सुधा चंद्रन यांनी टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुधा एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट शास्त्रीय नृत्यांगना देखील आहेत.
सुधा चंद्रन यांनी नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. सुधा यांनी वयाच्या तिस-या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली. पण 1981मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांना अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला होता. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांना त्यांचा उजवा पाय कापावा लागला. यानंतर त्यांचे आयुष्य फार बदलले होते. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. सुधा यांना नृत्याची आवड असल्याने पुन्हा कधीही डान्स करु शकणार नाही. अशी भीती त्यांना सतावत होती. मात्र यावरही त्यांनी मात केली. कृत्रिम पायाच्या मदतीने आणि फिजिओथेरपीच्या मदतीने ३ वर्षात त्यांनी चालायला सुरुवात केली होती. इतकंच काय तर कृत्रिम पाय असला तरी त्या उत्तम डान्स करु शकतात.
सिनेमा आणि नृत्याच्या दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सुधा ९० च्या दशकापासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. सुधा आत्तापर्यंत 'बहुरानियां', 'चंद्रकांता', 'कभी इधर कभी उधर', 'चश्मे बद्दूर', 'अंतराल', 'कैसे कहूं', 'कहीं किसी रोज', 'क्योंकि सास भी कभी बहू थी, 'कस्तूरी', 'अदालत' यासारख्या मालिकेत झळकल्या आहेत. मालिकाच नाही तर सिनेमातही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.