मराठमोळी अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे. नेहा गरोदर असून नुकतंच तिथे तिचं थाटात डोहाळजेवण झालं. अभिनेत्री सुकन्या मोने (Sukanya Mone) देखील तिच्या डोहाळजेवणाला उपस्थित होत्या. नेहाने सोहळ्याचे फोटो शेअर करत सुकन्या मोनेंचे आभार मानले आहेत. त्यांनीही कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.
नेहा गद्रे लग्नानंतर ५ वर्षांनी आई होणार आहे. ईशान बापटसोबत लग्न करुन ती कायमची ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली. सध्या ती गरोदरपणाचा आनंदत घेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने बेबीमूनचे फोटो शेअर केले होते. तर आता तिचं ऑस्ट्रेलियात मराठमोळ्या पद्धतीने थाटात डोहाळजेवणही पार पडलं. हेही फोटो तिने शेअर केले. हिरव्या रंगाच्या साडीत ती खूप सुंदर दिसत आहे. चेहऱ्यावर प्रेग्नंसीचा ग्लो दिसत आहे. दरम्यान नेहाच्या डोहाळजेवणाला अभिनेत्री सुकन्या मोनेही हजर होत्या. त्यांच्यासोबत त्यांची लेक ज्युलिया सुद्धा होती. हे फोटो शेअर करत नेहाने लिहिले, "सुकन्या ताई, आमच्या या खास क्षणी तुम्ही आलात त्याबद्दल आभार. इतक्या वर्षांनंतर तुम्हाला भेटून आनंद झाला."
सुकन्या मोने यांची लेक ज्युलिया ही ऑस्ट्रेलियातच असते. त्यामुळे त्यांची लेकीशी भेटही झाली आणि नेहाच्या डोहाळजेवणालाही जाता आलं. नेहाच्या पोस्टवर सुकन्या मोनेंनी कमेंट करत लिहिले, 'मलाही मज्जा आली, ऑस्ट्रेलियाला येऊन मला तुझं डोहाळ जेवण करता आलं'.
२०१९ मध्ये नेहाने ईशान बापटसोबत लग्न केलं. त्यानंतर नवऱ्यासोबत ती ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली.लग्नानंतर परदेशात गेल्याने नेहा अभिनय क्षेत्रापासून दुरावली आहे. तिथे राहून तिने डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली.'मन उधाण वाऱ्याचे'नंतर नेहा 'अजूनही चांदरात आहे' मालिकेत दिसली होती. 'मोकळा श्वास', 'गडबड झाली' या सिनेमांतही तिने काम केलं होतं.आता लग्नानंतर ५ वर्षांनी ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.