टीव्हीवरील लोकप्रिय खलनायिकेचा चेहरा असलेली अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या माधवीला 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिचं शालिनी हे पात्र प्रचंड गाजलं. अभिनयाबरोबरच माधवीच्या फिटनेस आणि सौंदर्याचीही चर्चा होते. माधवी तिच्या फिटनेसकडे काटेकोरपणे लक्ष देताना दिसते. माधवीचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून चाहते तिच्यावर फिदा होतात.
पण, लोकप्रियतेबरोबरच अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागलेला आहे. माधवीने नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अभिनयातील करिअरबरोबरच ट्रोलिंगवरही भाष्य केलं. माधवी म्हणाली, "माझ्याबाबतीत असंही म्हटलं जातं की हिची बॉडी नकली आहे. हिने लिपोसेक्शन केलं असेल. हिने हे सगळं खोटं लावलंय. कॉस्टेटिक सर्जरी केलेल्या आहेत. अशा कमेंट्स आणि लोक बोलताना मी ऐकलं आहे. हे ऐकून माझं असं झालं की ठीक आहे तुम्हाला तसं वाटत असेल. पण, माझ्या जवळच्या माणसांना माहीत आहे की मी यासाठी किती मेहनत घेतलेली आहे. हे सगळं मी कमावलेलं आहे. मला कौतुक या गोष्टीची वाटतं की माझी फिगर इतकी कमाल दिसते की लोकांना ते खोटं वाटतं."
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या माधवीने 'स्वप्नांच्या पलिकडले', 'हम तो तेरे आशिक है' या मालिकांमध्ये काम केलं आहे. अनेक मराठी सिनेमांतही ती झळकली आहे. 'पावनखिंड' या सिनेमात माधवी ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती. या सिनेमात तिने बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.