काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहवरील लाडक्या आणि गाजलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आवडती मालिका संपल्याने चाहत्यांबरोबर कलाकारही दु:खी झाले. पण, आता 'आई कुठे काय करते' नंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आता संपणार आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील गौरी-जयदीप ही जोडी प्रेक्षकांना भावली होती. आता जवळपास चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ही मालिका निरोप घेणार आहे. या आठवड्यात मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. मालिकेच्या दुसऱ्या पर्वात काही वर्षांच्या लीपनंतर जयदीप आणि गौरीचा पुर्नजन्म झाल्याचं दाखविण्यात आलं होतं. शालिनीचा अंत करण्यासाठी जयदीप-गौरीने पुर्नजन्म घेतला होता. आता मालिकेच्या शेवटी दोघे मिळून शालिनीचा अंत करणार असल्याचं दाखविण्यात येणार आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका २०२० मध्ये सुरू झाली होती. या मालिकेत गिरीजा प्रभू, मंदार जाधव, वर्षा उसगावकर, माधवी निमकर, कपिल होनराव, सुनील गोडसे या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. यापूर्वीच मालिकेतील काही कलाकारांनी एक्झिट घेतली होती. आता मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.