‘भाभीजी घर पर हैं’ या हिंदी मालिकेतील मलखान अर्थात दीपेश भान याच्या अकाली निधनाच्या दु:खातून टीव्ही इंडस्ट्री सावरते ना सावरते तोच आज आणखी एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी येऊन धडकली. मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम करणारे लोकप्रिय अभिनेते अरविंद धनू (Arvind Dhanu ) यांचे सोमवारी निधन झाले. उण्यापुऱ्या 47 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta ) या मालिकेमुळे अरविंद धनू प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी व मराठी टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अरविंद धनू हे सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमासाठी गेले होते. याच कार्यक्रमात त्यांना अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. पण यादरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आणि यानंतर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
अरविंद धनू यांच्या पश्चात पत्नी आणि मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्यावर माहीम येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. अरविंद धनू यांनी अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. लेक माझी लाडकी, सुख म्हणजे नक्की काय असतं, क्राईम पेट्रोल अशा काही मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. ‘एक होता वाल्या’ या मराठी चित्रपटामध्ये ते झळकले. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ ही त्यांची मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत त्यांनी शालिनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.