लव्ह मॅरेज केल्यामुळे औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथे एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकरणात सख्या आईनेच मुलाच्या मदतीने आपल्या लेकीची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून प्रत्येक स्तरांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या प्रकरणी हळहळ व्यक्त केली आहे. यामध्येच सुख म्हणजे नक्की काय असतं. या मालिकेतील अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री मिनाक्षी राठोडने (Meenakshi Rathore) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणाऱ्या मीनाक्षी राठोडने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने वैजापूर तालुक्यातील तरुणीच्या हत्येचा उल्लेख केला आहे. सोबतच तिने तिच्या घरातील लोक आंतरजातीय विवाहाकडे कशा पद्धतीने पाहतात हे सांगितलं आहे.
"आई...मोठ्या ताईचं intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल न तुला ताईचा. माझं कैलाशसोबत intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा! पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्यापणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली! काल परवा आपल्या लहान मुलीचं ही intercaste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जनरीत आहे हे सांगून दिलेस! हे स्विकाराचं बीज तुला कुठे गवसलं? आपल्याला 5 मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा ग control केलास? ते ही पप्पा नसतांना ,तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं?", असं मिनाक्षीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "हे असच "कीर्ती थोरे "च्या आईला का नाई वाटलं. एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठेपाई? तिने तर जातितच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं यापेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्यासारखी आई कीर्तीला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल, शुभम सारखे भाऊ ही! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचं बियाणं सापडू दे आई! काल परवाच सकारात्मक वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट, आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे. सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो swag तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांची आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कुस बदलतेय! हा swag खऱ्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्री मधे येवो!. "
दरम्यान, या पोस्टच्या माध्यमातून मिनाक्षीने आंतरजातीय लग्नाविषयी तिचं मत मांडलं आहे. सोबतच तिच्या आईने सध्याच्या युगात कशा प्रकारे स्वत:ला बदलून घेतलं आणि आपल्या मुलींच्या आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली हे सांगितलं.