सिनेइंडस्ट्रीत बऱ्याच कलाकारांना त्यांच्याविषयी अपमानास्पद आणि निंदनीय वक्तव्य केले जाते. तसेच सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जाते. यामुळे अनेक कलाकारांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असेच काहीसे सुंदरा मनामध्ये भरली (Sundra Manamadhye Bharli) मालिकेतील अभिनेत्रीसोबत घडले आहे. ही अभिनेत्री इतर कुणी नसून 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम 'कामिनी' अर्थातच पूजा पुरंदरे (Pooja Purandare).
अभिनेत्री पूजा पुरंदरेलासुद्धा 'सायबर अब्युझिंग'ला सामोरं जावे लागले आहे. इतकेच नव्हे तर हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पूजा पुरंदरेने स्वतः आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत खुलासा केला आहे. यासोबतच सर्वांना खास विंनतीदेखील केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून काही जणांकडून सोशल मीडियाचा गैरवापर होतोय की काय? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
अभिनेत्री पूजाने लिहिले, 'गेल्या काही दिवसांपासून मला इन्स्टाग्रामवर अनेक मेसेज आणि पोस्ट टॅग्स मिळत आहेत. एका विशिष्ट अकाउंटवरुन मला स्टोरीला किंवा पोस्टला टॅग केले जात आहे. जे खूप निंदनीय,अपमानास्पद आणि धमकीवजा होते. सुरुवातीला मी या गोष्टीला हलक्यात घेतले, त्याकडे दुर्लक्ष केले. मला वाटले की या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे हेसुद्धा काही परिणाम आहेत'.