Join us

सुंदरा मनामध्ये भरलीमधील सज्जनराव करतात महानगरपालिकेत काम, खऱ्या आयुष्यात दिसतात खूप वेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 5:32 PM

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील सज्जनराव या व्यक्तिरेखेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली जागा तयार केली आहे.

ठळक मुद्देभूमिकेविषयी संदेश सांगतात, ही व्यक्तिरेखा ऐकल्यानंतर लगेचच मी या मालिकेसाठी होकार दिला. ही व्यक्तिरेखा मला प्रचंड आवडली होती.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सज्जनराव ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सज्जनरावाच्या भूमिकेत आपल्याला संदेश उपशाम यांना पाहायला मिळत आहे. 

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील सज्जनराव या व्यक्तिरेखेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनामध्ये आपली जागा तयार केली आहे. लतिकाच्या प्रेमात पडलेले हे पात्र अगदी लहान मुलांसारखं आहे. साधा, पण प्रेमात वेडा झालेला सज्जनराव संदेश उपशाम यांनी उत्तम साकारला आहे. संदेश यांना अभिनयाची आवड असल्यामुळे ते या क्षेत्राकडे वळले. पण ते बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीला आहेत. ते महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

या भूमिकेविषयी संदेश सांगतात, ही व्यक्तिरेखा ऐकल्यानंतर लगेचच मी या मालिकेसाठी होकार दिला. ही व्यक्तिरेखा मला प्रचंड आवडली होती. ही मालिका सुरू झाल्यानंतर या मालिकेतील माझी बोलण्याची ढब आणि केसावरून हात फिरवण्याची स्टाईल लोकांना प्रचंड आवडते असे ते मला नेहमीच सांगतात. या दोन्ही गोष्टी मी या भूमिकेत स्वतः टाकल्या आहेत. 

संदेश पुढे सांगतात, या व्यक्तिरेखेचा मी विचार केला असता माझ्या लक्षात आले की, या सज्जनरावाचे वडील त्याला सतत ओरडतात. त्यांच्यामुळे त्याचे लग्न होत नाहीये. लोकांसमोर देखील त्याचे वडील त्याचा सतत अपमान करतात. या सगळ्यामुळे या व्यक्तीला स्वतःचा असा आवाज नाहीये. या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास कमी आहे.... असा विचार करून थोड्या बसक्या स्वरात मी संवाद बोलायचे ठरवले आणि लोकांना माझी ही ढब आवडली. केसांचे विचाराल तर त्याची सुप्त ईच्छा आहे की, त्याला स्टाईलमध्ये केसाची रचना करायची आहे. पण आई-वडिलांमुळे त्याला ती करता येत नाहीये. त्यामुळे मी केसाची एक बट काढायची ठरवली आणि तो स्वतःवर जेव्हा खूश होईल, त्यावेळी तो त्या बटवरून हात फिरवेल असा विचार केला. लोकांना माझी ही गोष्ट देखील प्रचंड आवडली. 

टॅग्स :कलर्स मराठी