Join us

Exclusive: सेलिब्रिटी ते डिलिव्हरी वूमन! अभिनेत्री असूनही अक्षया पोहोचवते लोकांच्या घरी जेवणाचे डबे

By शर्वरी जोशी | Published: July 24, 2023 8:00 AM

Akshaya naik: 'लोकमत ऑनलाइन'शी बोलत असताना अक्षयाने लोकांच्या घरी डबे पोहोचवण्या मागचं कारण सांगितलं.

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना आपलसं करणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक (akshaya naik). 'सुंदरा मनामध्ये भरली' (sundara manamadhe bharli) या मालिकेमध्ये लतिका ही भूमिका साकारुन अक्षया घराघरात पोहोचली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. विशेष म्हणजे प्रेक्षकांमधून अमाप प्रेम मिळत असूनही अक्षयाचे पाय अद्यापही जमिनीवर असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे तिच्या स्वभावातील या साधेपणाचा प्रत्यय नुकताच आला आहे. एक लोकप्रिय सेलिब्रिटी असूनही अक्षया आजही लोकांच्या घरी जाऊन त्यांना जेवणाचे डबे पोहोचवते.

अलिकडेच अक्षयाने 'लोकमत ऑनलाइन'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलत असताना तिने तिच्या नव्या फूड स्टार्टअप बिझनेसविषयी भाष्य केलं. यावेळी बोलत असतानाच अभिनयाची गाडी ओढत असतानाच तिने नवा व्यवसाय सुरु केल्याचंही सांगितलं. इतकंच नाही तर हा व्यवसाय करत असताना ती चक्क लोकांच्या घरी डिलिव्हरी वूमन म्हणून जेवणाचे डबे पोहोचवते असा खुलासा केला.

Exclusive: मुसळधार पावसात अक्षयाची आजी झाली होती बेपत्ता; शोध घेतल्यावर समोर आलं थक्क करणारं सत्य

"मला स्वत:चं असा काहीतरी व्यवसाय करायचा होता आणि त्यात मला सौरभ परांजपे या मित्राची साथ मिळाली. तो शेफ आहे. त्यामुळे तोच कायम किचनमध्ये जेवण करत असतो. पण, मी सुद्धा त्याला स्वयंपाक करायला शक्य होईल तशी मदत करते. मात्र, मेन जेवण तोच करतो. मी त्याला भाज्या चिरुन देणे, पॅकिंग करणे वगैरे ही काम करते. इतकंच कशाला मी कधी कधी लोकांच्या घरी डिलिव्हरी करायला सुद्धा जाते, असं अक्षया म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ज्यावेळी स्टाफ कमी असतो किंवा ऑर्डर्स जास्त असतात त्यावेळी मी स्वत: लोकांच्या घरी जेवणाचं पार्सल घेऊन जाते. आणि, हा स्टार्सअप बिझनेस आहे त्यामुळे जितके पैसे वाचवता येतील आणि स्वत:ला जितकी कामं जमतील तितकी काम आम्ही करतो. डिलिव्हरी करायला जातांना मी मुद्दाम चेहरा झाकून जाते. कारण कोणी ओळखू नये. पण, काही वेळा लोकांना कळतं कारण हा व्यवसाय कोणाचा आहे हे लोकांना हळूहळू कळू लागलंय. त्यामुळे मग काही लोक असतात जे कितीही चेहरा झाकला तरी ओळखतात. पण, हे सगळेच लोक खूप प्रेमाने वागतात, मला जेवायचा आग्रह सुद्धा करतात.

दरम्यान, गेल्या २ वर्षांपासून अक्षया सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेव्यतिरिक्त तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. परंतु, अभिनयाच्या क्षेत्रात पाय रोवत असतानाच तिने फूड इंडस्ट्रीमध्येही पदार्पण केलं आहे. अक्षयाचा स्वत:चा Culture Kitchen हा फूड स्टार्टअप बिझनेस आहे. तिच्या या व्यवसायामध्ये सौरभ परांजपे हा तिचा मित्रदेखील भागीदार आहे. 

टॅग्स :अक्षया नाईकसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन