हे जरा अतीच होतंय...; ‘सुंदरा मनामध्ये भरली’चा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 03:16 PM2021-12-15T15:16:33+5:302021-12-15T15:18:58+5:30
Sundara Manamadhe Bharli : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका कलर्स वाहिनीवर सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. तूर्तास मात्र ही मालिका ट्रोल होतेय.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) ही मालिका कलर्स वाहिनीवर सुरू झाली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. तूर्तास मात्र ही मालिका ट्रोल होतेय. होय, मालिकेतील एक एक अनपेक्षित वळण पाहून मालिकेचे प्रेक्षक भडकले आहेत. तीन दिवसांआधी कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला. या प्रोमोवर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तर ही मालिका बंद करा, अशी मागणी केली आहे. या प्रोमोमध्ये अभ्याची आई आणि दौलत यांच्यामध्ये भांडण झाल्याचं दाखवलं आहे. आता मालिकेतील भांडणं तर नेहमीचीच. त्यात नाराज होण्यासारखं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र हे भांडण ज्या हिंसक पद्धतीने दाखवलंय, ते पाहून प्रेक्षक भडकले आहेत.
दौलत अभ्याचे कपडे जाळतो. यावर माझ्या लेकराचे कपडे का जाळून राहिला तू, असा सवाल अभ्याची आई करते. यावर तुझ्या लेकाचा अंत्यविधी पण असाच करणार आहे मी, असं दौलत म्हणतो. त्याचं ते वाक्य ऐकून अभ्याची आई दौलतच्या थोबाडीत मारते. यामुळे चिडून दौलत तिला धक्का देऊन खाली पाडतो आणि तिचा अस्थमाचा पंप पायाने तुडवतो, असं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
फालतू मालिका आधी बंद करा, अशी मागणी एका युजरने केली आहे. अती दाखवलं आहे यामध्ये. इतके कोण अत्याचार करतो आणि कोण सहन करतो, अशी कमेंट एका युजरने केली आहे. वाहिनीवाल्यांना सल्ला की चांगलं काहीतरी समाजासमोर आणा. हे असले फालतू सीरिअल बंद करा, अशी मागणी एका युजरने केली आहे.
‘अती होत चाललंय आता. ही मालिका फक्त एकाच बाजूने दाखवली जाते. या बापलेकांना कधी शिक्षा मिळणार? कधी तरी बघणा-यांचा पण विचार केला पाहिजे, असं एकाने लिहिलं तर दर्जा किती घसरवावा हे चॅनेलला कळत नाही. काय तर म्हणे आनंदी-आनंद दाखवला की टीआरपी कमी होतो. म्हणून लॉजिकलेस काहीही दाखवायचं, अशा एका युजरने आपला राग व्यक्त केला आहे. हे असले दाखवून आजकालची मुले बिघडतात, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.