'सुंदरा मनामध्ये भरली' या तुफान गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक (akshaya naik). उत्तम अभिनयशैली, स्वभावातील गोडवा यामुळे अक्षयाने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अक्षयाच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच माहित आहे. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार मोजक्या लोकांना ठावूक आहे. अलिकडेच तिने लोकमत ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आजीचा एक घाबरवणारा पण तितकाच भन्नाट किस्सा सांगितला.
एकदा अक्षयाची आजी कोणालाही काहीही न सांगता घरातून अचानक गायब झाली होती. अनेकदा फोन करुन, आजूबाजुला चौकशी करुनदेखील तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती टेन्शनमध्ये आला होता. मात्र, काही तासांमध्ये त्यांच्यासमोर जे सत्य आलं ते थक्क करणारं होतं. अक्षयाच्या आजीला पाऊस प्रचंड आवडतो. त्यामुळे एकदा भर पावसात त्या घरात कोणालाही काहीही न सांगता थेट वरळी सी फेसला पावसात मनसोक्त भिजण्यासाठी गेल्या होत्या.
"एकदा वादळीवाऱ्यासह पाऊस पडत होता आणि आम्ही नानीला सातत्याने फोन करतोय की गेली कुठे, काय झालं. फोन उचलत नाहीये. शेजारच्यांना विचारलं तर ते सांगत होते की दरवाज्याला कडी आहे. नंतर कळलं की बिल्डींगमधल्या एका मैत्रिणीला घेऊन ती वरळी सी फेसला भिजायला गेली होती. त्यावेळी तिचं वय होतं ७०-७५ इतकं होतं, असं अक्षया म्हणाली.
दरम्यान, अक्षया तिच्या आजीला म्हणजेच आईच्या आईला नानी असं म्हणते. या मुलाखतीत तिने पावसाविषयी अनेक किस्से शेअर केले. लहान असताना पहिला पाऊस पडला की तिचे बाबा तिला आणि तिच्या बहिणीला बाईकवर बसून वरळी सी फेसला फिरायला घेऊन जात असंही तिने आवर्जुन सांगितलं.