सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी एपिसोडमध्ये फराह खान उपस्थित राहाणार आहे. फराह एक प्रसिद्ध कोरिओग्राफर असण्यासोबतच दिग्दर्शक, निर्माती आणि अभिनेत्री आहे. कपिलच्या या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील प्रवास, तिचे खाजगी आयुष्य यावर ती कपिल आणि तिच्या टीमसोबत गप्पा मारणार आहे.
याविषयी फराह सांगते, मैं हूँ ना या चित्रपटातील भूमिकेसाठी माझी पहिली पसंती नसिरुद्दीन शाह यांना होती. पण त्यांच्याकडे तारखा खूपच कमी असल्याने त्यांना शाहरुख खानच्या वडिलांची भूमिका देण्यात आली. त्यानंतर मी चेन्नईला जाऊन कमल हासन सरांना भेटले. त्यांना पटकथाही ऐकवली, पण त्यांनी नकार दिला. मग मी नाना पाटेकरशी संपर्क साधला... त्याला पटकथा आवडली तसेच त्याने कथानकात आणखी काही दृश्यांचा समावेश करण्याबद्दल सांगितले. मी त्यासाठी तयार देखील झाले. पण शेवटी नानाने सुद्धा भूमिका नाकारली. पण मी त्यानंतर विचार केला की, नायकाला खलनायकाच्या भूमिकेसाठी घेतले तर त्यात नावीन्य येईल आणि या पात्राला पुरेपूर न्याय मिळेल, हा विचार करूनच मी सुनील शेट्टीकडे गेले. चित्रपटाची केवळ अर्धी कथा ऐकूनच सुनील तयार झाला आणि शेवटी खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली.