कॉमेडीयन सुनील ग्रोवर लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्यासाठी सुनील सज्ज झाला आहे. कॉमेडी रिअॅलिटी शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर तो कमबॅक करत आहे. केवळ 12-15 एपिसोडची ही सिरीज असणार आहे. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींचाही सहभाग असणार आहे. या शोची संकल्पना कपिल शर्मा शो सारखीच असल्याचे सांगण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शोला कपिल शर्माची एक्स गर्लफ्रेंड आणि एक्स क्रिएटिव हेड प्रीति सिमोसच निर्मिती करत आहे. डिसेंबरमध्ये हा शो रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे चर्चा आहेत. शाहरुख खान आणि रणवीर सिंह सुनील ग्रोवरचे पहिले पाहुणे असणार आहेत. ज्यांच्याबरोबर सुनील ग्रोवर आपल्या अंदाजाने रसिकांचे मनोरंजन करताना दिसेल. या शोच्या माध्यमातून सुनील ग्रोवरचा फुल ऑन कॉमेडी अंदाज पुन्हा एकदा रसिकांना पाहता येणार आहे.
सुनील आणि कपिलमध्ये झालेला वाद मीडियात चांगलाच गाजला होता. पण आता हे दोघे त्यांचा वाद विसरून एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे. सुनील ग्रोव्हरने नुकत्याच पिंकव्हिला या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले आहे की, आम्ही दोघांनी एका खूप चांगल्या कार्यक्रमात एकत्र काम केले होते. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना आम्ही खळखळून हसवले आहे. मी सध्या काही चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यामुळे भविष्यात मी काय करणार याविषयी अद्याप काहीही सांगू शकत नाही.
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या ट्वीटवरून देखील या दोघांमध्ये सगळे काही आलबेल असल्याचे दिसून येत आहे. सुनीलचा पटाखा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना तो प्रचंड आवडत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी कपिलने ट्वीट करून या चित्रपटासाठी सुनील आणि विशाल भारद्वाज यांना शुभेच्छा दिल्या होत्या. कपिलने ट्वीट केल्यानंतर सुनील ग्रोव्हरने लगेचच रिप्लायद्वारे त्याचे आभार मानले आहेत. त्यामुळे आता ते पुन्हा एकत्र काम करणार याविषयी अंदाज बांधले जात आहेत.