स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. २ मे पासून दर रविवारी सायंकाळी ६ वाजता ही मालिका पहाता येईल. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे यांच्या दमदार अभिनयाने नटलेली ही मालिका पुन्हा पहाता यावी अशी मागणी प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होते.
नुकतीच या मालिकेने दोन वर्ष देखिल पूर्ण केली. यानिमित्ताने मालिकेतल्या कलाकारांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. या व्हिडिओला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळालाच शिवाय पुन्हा एकदा ही मालिका पहायला मिळावी अशा कमेण्ट्सही येत होत्या. त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘जिवलगा’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पहाता येणार आहे.
जिवलगा मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. मालिकेचं शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहे. त्यामुळेच जिवलगा मालिकेच्या या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे.
“जिवलगा’ ही एक खिळवून ठेवणारी प्रेमकथा आहे आणि प्रेक्षकांच्याही ती दीर्घकाळ लक्षात राहील अशीच आहे. परस्परसंबंधांची ही कथा असून शेवटी जे योग्य त्याच्या बाजूने ती प्रवास करते. ‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखविलेली प्रगल्भता व विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.
बऱ्याचदा आपली नाती समजून घेण्याची आणि त्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत चुकते. आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होते. त्यामुळे ही कथा प्रत्येक घरातील प्रेक्षकाला आपलीशी वाटते.