सुप्रिया पिळगांवकर आणि वैभव मांगले यांनी १४ वर्षांनंतर एकत्र केले काम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 10:27 AM
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई’ मालिकेत सुप्रिया पिळगांवकर आता एका मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेत काम करण्यासाठी त्या ...
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई’ मालिकेत सुप्रिया पिळगांवकर आता एका मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेत काम करण्यासाठी त्या प्रचंड खूश असून या मालिकेच्या चित्रीकरणाला त्यांनी सुरुवात देखील केली आहे. सुप्रिया यांनी मराठी आणि हिंदी मनोरंजन उद्योगात बरीच वर्षं काम केले आहे. सुप्रिया यांनी आजवर साकारलेल्या अनेक भूमिकांचे कौतुक झाले आहे. सुप्रिया मेरे साई या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याने या मालिकेत काम करण्यासाठी त्या खूप उत्सुक आहेत. या मालिकेत वैभव मांगले देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तो या मालिकेत कुलकर्णी ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. वैभवला मेरे साई मालिकेत कुलकर्णी या पात्राची भूमिका साकारायला मिळाली असल्याचे सुप्रियाला समजले असता तिने फोन करून त्याचे अभिनंदन केले होते. गंमत म्हणजे तिला त्यावेळी ठाऊक नव्हते की, लवकरच ती देखील या मालिकेत काम करणार आहे. १४ वर्षांनंतर सुप्रिया आणि वैभव एकत्र काम करत आहे. त्यामुळे एकमेकांसोबत इतक्या वर्षांनी पुन्हा काम करण्याचा त्याला चांगलाच आनंद झाला होता. मेरे साई या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी त्या दोघांनी पूर्वी एकत्र केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. याविषयी सुप्रिया सांगतात, “मी मराठी मनोरंजन क्षेत्रापासून माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू हिंदी मनोरंजन क्षेत्रात देखील मला काम मिळू लागले. वैभव हा बर्याच वर्षांपासून माझा स्नेही आहे. किंबहुना, त्याचा पहिला चित्रपट नवरा माझा नवसाचा हा चित्रपट माझ्या पतीने म्हणजेच सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला होता. मला जेव्हा कळले की, वैभवला मेरे साई मालिकेत भूमिका मिळाली आहे, तेव्हा मी फोन करून त्याचे अभिनंदन केले होते. मी त्याला नेहमी विनोदी भूमिका साकारताना पाहिले आहे. त्यामुळे त्याला नकारात्मक भूमिकेत पाहण्याची मला खूप उत्सुकता होती. तो या मालिकेत खूपच चांगले काम करत आहे. माझा वैभवसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान आहे.”Also Read : सुप्रिया पिळगावकर यांच्या घरातल्यांच्या भीतीमुळे सचिन पिळगांवकर या पत्त्यावर पाठवायचे त्यांना पत्र