डिजिटल माध्यमाने तरूणाईला चांगलीच भुरळ पाडली आहे. डिजिटल माध्यमांवरील लघुपट व वेबसीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. दिवसेंदिवस वेब सीरिजच्या संख्येतही वाढ होताना दिसते आहे आणि हिंदी व मराठी कलाकारही वेबसीरिजमध्ये काम करण्यासाठी रुची दाखवत आहेत. आता अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर देखील डिजिटल माध्यमात एन्ट्री करणार आहे. 'होम' या आगामी वेबसीरिजमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
निर्माती एकता कपूर आणि हबीब फैजल यांच्या 'होम' ह्या वेब सीरिजमध्ये सुप्रिया मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'इशकजादे', 'दो दुनी चार' आणि 'दावत ए इश्क' यांसारख्या चित्रपटाची निर्मिती करणारे हबीब आता डिजिटल विश्वात आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. 'होम' ही वेब सीरिज एका सत्य घटनेवर आधारित असून एका सोसायटीभोवती त्याची कथा फिरते. मध्यम वर्गीयांचे घर घेण्याचे स्वप्न, त्यासाठी सुरू असणारी धडपड आणि बिल्डरच्या चुकीमुळे बेघर झालेली कुटुंबे यात रेखाटण्यात येणार आहे. सुप्रिया यांच्यासोबतच इतरही मोठे कलाकार यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'होम' या वेबसीरिजमध्ये सुप्रिया पिळगावकर स्कूटर चालवताना दिसणार आहेत. या सीरिजमधील भूमिका वास्तविक वाटण्यासाठी त्या स्कूटर चालवायला शिकल्या. या सीरिजच्या शूटिंगवेळी त्यांचा छोटा अपघातही झाला आणि त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. ही दुखापत या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. निर्मात्यांनी या सीरिजमध्ये जेवण बनवताना हात भाजला असे दाखवले आहे. या वेबसीरिजमध्ये सुप्रिया पिळगावकर यांच्यासह आणखीन कोण कलाकार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच सुप्रिया यांना वेबसीरिजमध्ये काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.