Join us

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या मेगा ऑडिशनला होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:41 PM

सूर नवा ध्यास नवाच्या या छोट्या सूरवीरांच्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. मागील आठवड्यामध्ये सिटी ऑडिशनचे भाग प्रसारित झाल्यानंतर या सूरवीरांमधून कुणाची निवड होणार याचे वेध आता प्रेक्षकांना लागले आहेत. आता होणाऱ्या मेगा ऑडिशनमधून याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

संगीत हा मराठी रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्या कोणत्याही सण आसवांमध्ये मनाला स्फूर्ती देण्याचं काम संगीत करतं. विविध स्थरातील, वयोगटातील लोकांना एकत्र आणण्याचं काम संगीत करतं. त्यामुळे अशाच निखळ, निरागस आणि सुरांनी भरलेला बहारदार संगीत मैफलीचा अनुभव रसिकांना देण्यासाठी कलर्स मराठीने आणलं आहे सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर हे नवं पर्व. 

सेलिब्रिटी गायकांच्या गायकीने पहिलं पर्व गाजल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढलेल्या छोट्या सूरवीरांचं हे पर्व आता रंगणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख आठ शहरांमधून तब्बल सहा हजार मुलांमधून निवड झालेल्या ६ ते १५ वयोगटातील बालगायकांची मेगा ऑडिशनची फेरी १३ ऑगस्ट पासून सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मागील पर्वाप्रमाणेच याही पर्वात आपल्या परिक्षणाने आणि ‘दाद’ देण्याच्या शैलीने, मार्गदर्शनाने प्रेक्षकांची मने जिंकलेले अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे परीक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत. तर सर्वांची लाडकी अभिनेत्री, स्पृहा जोशी या नव्या कोऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. 

सूर नवा ध्यास नवाच्या या छोट्या सूरवीरांच्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अनेक वर्षानंतर मराठी वाहिनीवर असं पर्व येत असल्याने ही उत्कंठा शिगेला पोहचली होती. मागील आठवड्यामध्ये सिटी ऑडिशनचे भाग प्रसारित झाल्यानंतर या सूरवीरांमधून कुणाची निवड होणार याचे वेध आता प्रेक्षकांना लागले आहेत. आता होणाऱ्या मेगा ऑडिशनमधून याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

कार्यक्रमाबद्दल अवधूत गुप्ते सांगतो, “गेल्या बऱ्याच वर्षांपासून लहान मुलांसाठीचा असा कार्यक्रम मराठी वाहिनीवर आला नाही. या कार्यक्रमाद्वारे लहान मुलांना त्यांच्यातील कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्यासठी मंच आणि संधी मिळणार आहे. तब्बल पाच हजार मुलांमधून ७० मुलांची निवड केली आहे आणि त्यामधून निवडलेली मुलं त्यांच्यातील कला सादर करण्यासाठी सज्ज आहेत. या सुंदर गायकांमधून एक सूरवीर शोधण्याची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर सोपावली आहे असे मी म्हणेन. प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आणि वेगळा टॅलेंट देण्याचा प्रयत्न आम्ही यावेळेस करू. “सूर नवा” या कार्यक्रमाची संपूर्ण टीम सज्ज आहे इतिहास घडविण्यासाठी”. 

टॅग्स :सूर नवा ध्यास नवा