१७ जानेवारीपासून रात्री ११ वाजता नवी मालिका 'पिंकीचा विजय असो' सुरु होणार आहे.आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. खाईन तर तुपाशी अशा ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल. नवोदित अभिनेत्री शरयू सोनावणे पिंकी ही भूमिका साकारणार असून तिचा हटके अंदाज रसिकांना नक्कीच आवडेल.
आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातल्या नंतर बालकलाकार हर्षद नायबळची आता मालिका विश्वात एण्ट्री होणार आहे. ‘पिंकीचा विजय असो’ या नव्या मालिकेत तो पिंकी या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहे. दिप्या असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पिंकी आणि पिंकीची लहान बहिण निरीला नेहमी साथ देणारा असा हा लाडका भाऊ आहे. वयाने लहान असला तरी तितकाच समंजस आणि वडिलांच्या मेहनतीची जाण असलेला हा दिप्या आहे.
हर्षदला गाण्याची आवड तर आहेच. मात्र या मालिकेच्या निमित्ताने त्याची अभिनयाची आवडही जोपासली जाणार आहे. पिंकीचा विजय असो ही त्याची पहिलीच मालिका असून तो या भूमिकेसाठी खुपच उत्सुक आहे. सेटवर हर्षद सर्वांचा लाडका असून तो आपल्या गाण्याने सर्वांचच मनोरंजन करत असतो. नव्या वर्षात हर्षदचा हा नवा अंदाज पाहणे रसिकांसाठी रंजक असणार आहे.
या मालिकेविषयी सतीश राजवाडे म्हणाले, 'पिंकी हे कुतुहल निर्माण करणारं पात्र आहे. जगण्याची उर्मी देणारं, परिस्थितीला न घाबरणारं आणि सतत विजयी कसं होता येईल याचा ध्यास असणारं. सध्याच्या परिस्थितीत असं पात्र रसिकांचं मनोरंजन करेल तसंच स्फुर्ती सुद्धा देईल.'