Suraj Chavan : लहानशा मोढवे गावातून आलेला सूरज चव्हाण आज संपूर्ण महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाला आहे. महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण (Suraj Chavan) 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. बिग बॉस संपल्यानंतरही मातीशी जोडलेला सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. अशातच सूरजच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने पोस्ट शेअर करत सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच सूरजने स्वत:चे वेगळेपण दाखवलं होतं. घरातील सर्व सदस्यांसोबत त्याने एक खास नात बनवलं होतं. हे नाते तो घराबाहेरही जपताना दिसून आला. जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, वैभव चव्हाण आणि इरिना हे सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेले होते. यांच्या भेटीचे खास क्षण सूरजने सोशल मीडियावर शेअर केले होते. पण, या सर्व पोस्ट सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट झाल्यात. यामुळे सूरजने पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.
सूरजने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. त्यात लिहलं, "नमस्कार मी आपल्या सर्वांचा, महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण. माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे काही अत्यंत महत्त्वाच्या पोस्ट्स डिलीट झाल्या आहेत. त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताईच्या पण पोस्ट होत्या. यापुढे मी स्वत: लक्ष देईन आणि काळजी घेईन. तर आपणा कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा! आपलाच सूरज चव्हाण".
दरम्यान, सूरज चव्हाणचं ( Suraj Chavan ) बालपण अत्यंत बेताच्या परिस्थितीत गेल्यामुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आलेलं नाही. ३० वर्षांचा सूरज चव्हाण फक्त आठवी पर्यंत शिकला आहे. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. टिकटॉक बंद झाल्यावर तो इन्स्टाग्राम रील्स बनवून लोकप्रिय झाला. सूरजकडे पैसा आणि प्रसिद्धी आल्यानंतर अनेकांनी त्याच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला. अनेकदा त्याची फसवणूकही झाली आहे.