Join us

"घर बांधून झाल्यावर पुजेला रितेश दादा आणि जिनिलिया वहिनी...", सूरज चव्हाण काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 2:31 PM

घर बांधून झाल्यावर सुरज चव्हाण हा घराच्या पुजेला रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांना बोलवणार आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या यंदाचा पाचवा सीझन खूपच गाजला. सुरज चव्हाण (Suraj Chavan) 'बिग बॉस'चा विजेता ठरला. त्याची साधी बोली आणि साधं राहणीमान, याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि तो यशस्वी झाला. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. सूरज चव्हाण आता स्वत:चं घर बांधणार आहे. घर बांधून झाल्यावर सुरज घराच्या पुजेला रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांना बोलवणार आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात असताना होस्ट रितेश देशमुखने सुरज चव्हाण पहिल्या दिवसापासून गेम खेळण्यासाठी प्रोहत्साहन दिलं होतं. तसेच जेव्हा सुरज बिग बॉस जिंकला. तेव्हा सुरजच्या साध्या भोळ्या स्वभावाचा कुणी फायदा घेणार नाही, यासाठी त्याला एक मॅनेजर उपलब्ध करुन दिला. तसेच गरज पडेल तेव्हा मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. सूरजचेदेखील रितेश देशमुखवर खूप प्रेम आहे. 

नुकत्याच लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत सूरजने सांगितलं की, त्याला रितेशने मुंबईत त्याच्या घरी बोलवलं आहे. सूरज म्हणाला, "रितेश सर हे देवमाणूस आहेत. त्यांचा साधा-सिंपल स्वभाव आहे, हाच स्वभाव आवडतो. त्या दोघांनी मला सांगितलंय आमच्या घरी ये…आणि मी आता मुंबईला गेल्यावर नक्की त्यांच्या घरी जाणार. माझं घर बांधून झाल्यावर पुजेला रितेश दादा आणि जिनिलिया वहिनी नक्की येणार", असंही सूरजने सांगितलं. 

दरम्यान, सूरज चव्हाण याला घर बांधून देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. सूरजच्या या नवीन घराचं बांधकामही आता सुरू होणार आहे. नुकतंच भुमीपूजनही पार पडलं. तर  पुढच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुरज त्याच्या नवीन घरात प्रवेश करेल, असा शब्द अजित पवार यांनी  दिला आहे. सूरज चव्हाण मूळचा पुण्यातील बारामती तालुक्यातील आहे. बारामतीतलं मुडवे हे त्याचं गाव आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा