‘दिल है हिंदुस्तानी-२’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून आता या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांना नुकतेच नामवंत पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुरेश वाडकर यांनी या स्पर्धकांना विविध आव्हाने दिली आणि ती पूर्ण कशी करायची, याचे मार्गदर्शनही केले. वाडकर यांच्यासारख्या दिग्गज पार्श्वगायकासमोर या कार्यक्रमात स्पर्धकांनी त्यांची लोकप्रिय गीते सादर करणे हा स्पर्धकांसाठी आनंददायक अनुभव होता. आपल्या अनेक दशकांच्या गायनाच्या कारकीर्दीत आर. डी. बर्मन, विशाल भारद्वाज, ए. आर. रेहमान वगैरे अनेक महान संगीतकारांबरोबर काम करताना आलेले अनुभव यावेळी वाडकर यांनी स्पर्धकांना सांगितले.
गाण्याच्या रिअॅलिटी कार्यक्रमातील स्पर्धकांना वाडकर यांच्यासारख्या दिग्गज पार्श्वगायकाबरोबर एकाच व्यासपीठावर आपली गाणी सादर करण्याची संधी प्रथमच उपलब्ध होत आहे. या भागाबद्दल सुरेश वाडकर सांगतात, “जगाच्या विविध भागांतून आलेल्या इतक्या गुणी गायकांबरोबर मलाही गाण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद होत आहे. मला हा कार्यक्रम फार आवडतो. जगाच्या विविध भागांतील गायकांनी लोकप्रिय भारतीय संगीताला स्वत:च्या शैलीचा रंग भरून कसं आपलंसं केलं आहे, ते पाहणं हा एक वेगळाच अनुभव होता. हिंदी संगीताला जागतिक स्तरावर सादर करणारा ‘दिल है हिंदुस्तानी-२’ हा एकमेव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक क्षण मी उपभोगला असून या कार्यक्रमात पुन्हा सहभागी होण्यास मला निश्चितच आवडेल.”
‘दिल है हिंदुस्तानी-२’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सरहद्दी पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणार्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातात. ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.