Join us

​सारेगमपा लिटल चॅम्पसच्या जसू खान या स्पर्धकाला फॅनने केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 4:24 AM

सारेगमपा लिटल चॅम्पस हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच या कार्यक्रमातील लहान मुले त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकत आहेत. ...

सारेगमपा लिटल चॅम्पस हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच या कार्यक्रमातील लहान मुले त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मने जिंकत आहेत. या सगळ्याच स्पर्धकांचा आवाज एकाहून एक सरस असल्याने या सगळ्यांमध्ये विजेता कोण ठरेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमातील जसू खान हा तर परीक्षकांचा प्रचंड लाडका आहे. तो एक खूपच चांगला गायक आहे. जसूची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. त्यामुळे आज वयाच्या केवळ 13व्या वर्षी तो त्याच्या हिमतीवर त्याचे घर चालवत आहे. त्याचे बालपण हे सगळेच कष्टातच गेले. त्याचे वडील दारुडे असल्याने घर कसे चालणार अशी परिस्थिती होती. अशावेळी त्याने लहान वयापासून लग्नात आणि पार्टींमध्ये गाणी गायला सुरुवात केली. त्यातून मिळालेल्या पैशातून तो संपूर्ण घर सांभाळतो. त्याच्या या गोष्टीचे परीक्षकांसोबतच प्रेक्षकांनादेखील कौतुक आहे. त्याने नुकतेच कार्यक्रमात रंग दे बसंती हे गाणे सादर केले होते. या गाण्यासाठी त्याला ज्यूरी आणि मेंटर यांच्याकडून स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. तो गात असताना स्टुडिओत उपस्थित असलेल्या सगळ्यांनी ठेका धरला होता. त्याचा हा परफॉर्मन्स अफलातून झाला. त्याचसोबत या कार्यक्रमाचे परीक्षक जावेद अली यांनी स्टेजवर येऊन त्याच्या गाण्याची प्रशंसा केली. अली सोबत स्टेजवर शेलेंद्र नावाचा एक माणूसदेखील आला होता. तो सारेगमपा लिटल चॅम्पस या कार्यक्रमाचा मोठा फॅन आहे. पण त्याचसोबत तो जसूचा मोठा फॅन आहे. जसूचा खास परफॉर्मन्स पाहाण्यासाठी तो तिथे आला होता आणि येताना त्याने जसूसाठी एक खास गिफ्ट आणले होते. शेलेंद्रने जसूला भेट म्हणून 70 हजाराचा चेक दिला. जसूच्या वडिलांच्या आजारपणात त्याच्या आजीचे सगळे दागिने त्याला गहाण ठेवायला लागले होते. हे दागिने परत मिळवण्यासाठी पैसे भरण्याची गरज आहे. पण जसूकडे तेवढे पैसे नाहीत. त्यामुळे शैलेंद्रने दागिने सोडवण्यासाठी जसूला हे पैसे दिले.