अभिनेता सुशांत सिंह आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्याबद्दल प्रसिध्द आहे. ‘सावधान इंडिया’च्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करणा-या सुशांत सिंहने सूत्रसंचालनात आता चांगलेच प्रवीण्य मिळविले असून त्याला आता वृत्त निवेदन करायचे आहे. सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असून भारतीय टीव्हीवर सूत्रसंचालन करण्याबद्दल तो समाधानी आहे. पण सूत्रसंचालनाच्या या प्रदीर्घ अनुभवामुळे त्याला सूत्रसंचालनाबद्दल बरीच माहिती मिळाली असून आता संधी मिळाल्यास लोकप्रिय वृत्त वाहिन्यांवरील गुन्हेगारीविषयक कार्यक्रमात वृत्त निवेदनाचे काम करण्यास आपल्याला आवडेल, असे त्याने म्हटले आहे. तसेच एखाद्या वादविवाद कार्यक्रमातही आपले अनुभव सादर करण्याची त्याची इच्छा आहे. ‘सावधान इंडिया’च्या सूत्रसंचालनामुळे बातम्यांच्या संवेदनशीलतेचे महत्त्व आपल्याला जाणवले असून त्यामुळे अशा वाहिनीवर आपण एक उत्तम वृत्त निवेदक म्हणून काम करू शकतो, असे त्याला वाटते.
18 जुलैपासून ‘इंडिया टीव्ही’वर ‘सावधान इंडिया'या शोचा नवीन सिझन सुरू झाला आहे.या शोच्या विशेष भागात मनोज वाजपेयी सुत्रसंचालन करणार आहेत.हा खास एपिसोड येत्या स्वातंत्रदिनी प्रसारित होणार आहे. या मालिकेत आता नव्या काळातील गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून कट्टर गुन्हेगार आपल्या कार्यशैलीत कसे बदल करत असून ते लोकांची फसवणूक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करतात ते यात दाखवले जाणार आहे.चेह-यावर स्मितहास्य ठेवणारा टॅक्सीचालक,तुमच्याबद्दल जरा जास्तच काळजी दाखवणारा कॉल सेंटरचा कर्मचारी किंवा अतिउत्साही डिलिव्हरी बॉय हे भावी गुन्हेगार असू शकतात. त्यांना तुमच्या जीवनात प्रवेश देण्यापूर्वी अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. याआधीच्या सिझनमध्येही गुन्हे आणि गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी सावधान इंडियाने खास जनजागृतीही केल्याचे आपण पाहिले आहे.तसचे पूर्वीप्रमाणेच सुशांत सिंह हा याशोचे सुत्रसंचालन करत आहे.
‘वक्त के साथ अपराधी हुआ अपग्रेड,आप भी हो जाईयें अप टू डेट’ अशी टॅगलाईन असलेल्या या शोमधून मधून आपल्याला जर आपण सतर्क नसलो तर आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक धोक्यांची जाणीव करून दिली जाणार आहे.काहीवेळा अतिशय साधारण गोष्टीसुद्धा केवळ आपण सतर्क न राहिल्यामुळे कशाप्रकारे धोकादायक बनू शकतात हे यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.