'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सुव्रत जोशी. अल्पावधीतच सुव्रतने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सुव्रत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. सध्या सुव्रतने केलेल्या अशाच एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने दिल्लीत एक प्रसंग शेअर केला आहे. दिल्लीतील प्रसिद्ध अशा नागपाल छोले भटूरेबाबत सुव्रतने पोस्ट लिहिली आहे. या छोले भटुरेच्या हॉटेलमध्ये बालकामगार काम करत असल्याचं सुव्रतने म्हटलं आहे.
सुव्रतने पोस्टमध्ये काय म्हटलं?
नागपाल छोले भटुरे हे माझ्या आयुष्यातील बेस्ट ठिकाण होतं...पण, त्यांनी छोट्या मुलांना कामावर ठेवलं आहे(बालकामगाराच्या नियमांचं उल्लंघन करुन). दिल्लीत जिकडेतिकडे G20चे होर्डिंग्स लागलेल्या २१व्या शतकात हे घडत आहे. हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. हे कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही. मी तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीबरोबर बोललो. ती त्याचीच मुलं असल्याचं त्याने मला सांगितलं. मुलांना असं काम करायला लावू नकोस आणि मुलांना शाळेत पाठवण्यासाठी मालकाची मदत घे, असं मी त्याला सांगितलं. हा मालक लाखोंमध्ये पैसे कमावत असेल. असं बालकामगारांना कामावर ठेवणं लज्जास्पद आहे. त्या मालकाला मला भेटायचं होतं. पण, तो बाहेर गेला होता. यासाठी मला कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या कोणी मदत करू शकेल का?
सुव्रतने २०१९मध्ये मराठी अभिनेत्री सखी गोखलेबरोबर लग्नगाठ बांधली. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'ताली' वेब सीरिजमध्ये सुव्रत दिसला होता. या सीरिजमधील त्याच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं होतं.