Join us

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत स्वामी पादुकांचा अद्भुत दैवी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:34 IST

Jai Jai Swami Samarth Serial : जय जय स्वामी समर्थ मालिकेत अलौकिक चरण पादुका लीलेच्या प्रचितीचा दैवी अध्याय या महिन्यात भक्तांना पाहायला मिळत आहे.

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ (Jai Jai Swami Samarth Serial ) मालिकेत अलौकिक चरण पादुका लीलेच्या प्रचितीचा दैवी अध्याय या महिन्यात भक्तांना पाहायला मिळत आहे. स्वामी चरणपादुकांचा दैवी अध्याय सध्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेत सुरु आहे आणि आता याच शृंखलेत आता अजून एक अध्याय जोडला जाणार आहे. येत्या आठवड्यात बघायला मिळणार आहे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. 

या अध्यायातला महत्वाचा टप्पा या आठवड्यात सादर होतो आहे, स्वामी चरणपादुका जश्या पिढ्यांपिढ्या पूजल्या जातात, तश्याच ज्या घरात त्यांची पूजा थांबते तेव्हा त्या योग्य व्यक्तीच्या हाती जातात. स्वामींच्या पादुकांचा हा दैवी प्रवास विलक्षण रंजक असून त्यापाठची उत्कंठावर्धक कथा सोपान आणि अवंती या दोन वेगळ्या गावात राहणाऱ्या स्वामी भक्तांच्या लोकविलक्षण गोष्टीतून उलगडत जाते. प्रत्येक स्वामी भक्तांने आवर्जून पहावी अशी ही गोष्ट चरणपादुकांच्या अध्यायातल्या अज्ञात अश्या पैलूवर प्रकाश टाकते. 

"अनुभवाशिवाय विश्वास बसत नाही, आणि चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही,"  स्वामींच्या या शब्दांना प्रत्येक भागात उजाळा मिळत आहे. या अध्यायाची सुरुवात झाली आस्तिक देवकी आणि नास्तिक यमुना या दोन घनिष्ट मैत्रिणींच्या गोष्टीनी. यांनतर आरंभ झाला नव्या परंपरेचा ज्यात उलघडला स्वामी मुखवट्याचा महिमा. स्वामींच्या मुखवटा - पादुकांमधून प्रकट होणाऱ्या चमत्काराने नवजात बाळावर पडणारी पिशाच्च सावली दूर होते आणि देवकीला पुत्रसुख प्राप्त होते. आता या स्वामी पादुकांनी सोपान आणि अवंती या भक्तांचा कसा उद्धार होणार ? पुढे मालिकेला कुठले रंजक वळण येणार हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागेल.