अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून संपू्र्ण देशभर या सोहळ्याची लगबग सुरू होती. अखेर आज अनेक वर्षांपासूनची देशवासी आणि अयोध्यावासीयांची प्रतीक्षा संपली. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीनेही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.
स्वप्नील जोशीने 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीराम आणि सीता मातेचा पूत्र असलेल्या कुशची भूमिका साकारली होती. या मालिकेत बालकलाकार म्हणून त्याचं कौतुकही झालं होतं. स्वप्निलने इन्स्टाग्रामवरुन याचा एक व्हिडिओ शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. "उत्तर रामायणात मी प्रभू श्रीराम यांचा पूत्र भगवान कुश यांची भूमिका साकारली होती. छोट्याशा वयात मला ही संधी मिळालं, हे माझं भाग्यचं आहे. माझ्या जीवनातील हा अलौकीक क्षण आहे. प्रभू श्रीरामाच्या चरणी छोटीशी सेवा अर्पण! आज पवित्र भूमी अयोध्येत श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडत आहे. एक हिंदू आणि भारतीया म्हणून हा माझ्यासाठी आनंददायी क्षण आहे. सियावर रामचंद्र की जय ! सीता मैया की जय ! पवनसूत हनुमानजी की जय !", असं स्वप्नील जोशीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. रामललाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज संपूर्ण देशभर दिवाळी साजरा करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत दाखल झाले आहेत.