चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची फ्रेश व युथफूल प्रेमकहाणी ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या मालिकेत प्रेक्षकांना पहायला मिळतेय. सौरभची भूमिका स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) साकारतोय आणि अनामिका साकारतीये शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar). सध्या या मालिकेची जोरदार चर्चा आहे. अल्पावधीत मालिका चाहत्यांच्या पसंतीत उतरली आहे. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची अनोखी केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. पण तूर्तास या मालिकेच्या निमित्ताने एक खास माहिती समोर आली आहे. होय, ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले स्वप्नील-शिल्पा यापूर्वी सुद्धा एका मालिकेत झळकले आहेत. खास म्हणजे, या मालिकेत त्यांनी चक्क मायलेकाची भूमिका साकारली होती. आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे.
तुम्हाला कदाचित माहित नसेल पण, 1999 मध्ये आलेल्या ‘हद कर दी’ या हिंदी विनोदी मालिकेत स्वप्नील आणि शिल्पा एकत्र दिसले होते. या मालिकेत स्वप्नीलने शिल्पाच्या मुलाची भूमिका साकारली होती. आता इतक्या वर्षानंतर ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या निमित्ताने शिल्पा व स्वप्नील ‘लव्हबर्ड्स’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा जन्म 10 मार्च 1977 मध्ये मुंबईमध्ये झाला होता. ती भावंडांमध्ये सर्वात मोठी असून तिला दोन लहान भाऊ आहेत. शिल्पाच्या पतीचं नाव विशाल शेट्टी असं आहे. या दांम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रूईया महाविद्यालात असताना शिल्पाने नाटकात काम करायला सुरूवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी पहिलं नाटक करणा-या शिल्पाला यानंतर अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. काही जाहिरातींमध्ये ही तिने काम केले.
शिल्पाने 1993 मध्ये ‘ब्योमकेश बक्षी’ या हिंदी मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. दूरदर्शनवरच्या या गाजलेल्या मालिकेतील एका एपिसोडमध्ये तिने एक पाहुण्या कलाकाराची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘देवकी’ या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. हा चित्रपट अतिशय गाजला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केलं होतं. स्वप्नील जोशीबद्दल तर तुम्हाला ठाऊक आहेच.