स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत कोंडाजी बाबा फर्जंद ही व्यक्तिरेखा अभिनेते आनंद काळे साकारत आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील त्यांची भूमिका नुकतीच संपली. या मालिकेतील त्यांचे चित्रीकरण संपल्यामुळे ते चांगलेच भावुक झाले आहेत.
आनंद काळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कोंडाजी बाबा फर्जंद... काय बोलू ... खूप काही साठलंय... एका अभिनेत्याच्या आयुष्यात काही मोजक्याच भूमिका येतात ज्या अतिशय महत्त्वाच्या असतात. सगळ्याच बाजूने... माझ्या अभिनय कारकिर्दीत सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरली ती ही... कोंडाजी बाबा फर्जंद, तुम्हा सर्वांसाठी आज हे सगळं संपेल... माझ्यासाठी १६ सप्टेंबरला पहाटे ५.३० ला शेवटचा शॉट झाला... कोंडाजी बाबाचं पॅकअप... डोळे भरून आले... कोंडाजी बाबाला सोडून बाहेर पडताना अवघड झालं... अजूनही पुरता नाही बाहेर पडलोय... थोडा वेळ लागेल... साधारण ५६ दिवस मी कोंडाजी बाबा जगलो... त्यातले शेवटचे ५ ते ६ दिवस आणि रात्री... खूप अवघड गेले... शूट करून दमून घरी आलो तरी झोप नाही... कोंडाजी बाबा सिद्दीला जिवंत का सापडेल? स्वतःला पेटवून घेऊन का कोठारात जाणार नाही? जाताना ५०-१०० घेऊन जाईल... असे अनेक विचार... पकडल्यानंतर देखील सिद्दीला मारायचा प्रयत्न कसा करेल? रिहर्सल ही करून झाली... पण ही एक मालिका आहे हे भान ठेवून सगळं सादर करावं लागतं... याची जाणीव झाली...
असो... पण या भूमिकेने खूप काही शिकवलं... एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला... माझ्या मर्यादा कळल्या... एक वेगळी समज तयार झाली... तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलंत... खूप प्रेम दिलंत... भारावून गेलो मी... एक अभिनेता यासाठी खूप आसुसलेला असतो... ते या भूमिकेने मला पुरेपुर मिळवून दिले... मला एक वेगळी ओळख मिळवून दिली... मी एका वेगळ्या दर्जामध्ये गणला जाऊ लागलो... एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवलं मला... माझ्या कारकिर्दीत हा महत्त्वाचा टप्पा ठरला... यासाठी तुम्हा सर्वांचेच खूप खूप आभार... तुम्ही मला जे प्रेम, सन्मान दिले, या स्थानावर आणून बसवलेत त्या करता पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार... असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या... हर हर महादेव.