स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या पहिल्या भागापासून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून ही मालिका संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये देखील नेहमीच अव्वल असते. या मालिकेत संभाजी राजे यांची मुख्य भूमिका डॉ. अमोल कोल्हे साकारत असून त्यांनी या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या मालिकेची संपूर्ण टीम या मालिकेच्या यशासाठी नेहमीच मेहनत घेताना दिसते.
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे दिग्दर्शन कार्तिक केंढे, विवेक देशपांडे यांचे असून या मालिकेची निर्मिती डॉ. अमोल कोल्हे, घनश्याम राव आणि विलास सावंत यांनी केले आहे. तुम्हाला माहीत आहे का, विलास सावंत यांची मुलगी ही आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. एवढेच नव्हे तर तिने नुकत्याच एका हिंदी चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.
विलास सावंत यांच्या मुलीचे नाव पूजा सावंत असून तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते. या चित्रपटात पूजाचा एक वेगळा अंदाज तिच्या फॅन्सना पाहायला मिळाला होता. पूजाचा पुढचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात.