छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठिपक्यांची रांगोळी(Tipkyanchi Rangoli)मधील सर्वांचा लाडका कुकी म्हणजे अभिनेता अतुल तोडणकर (Atul Todankar) सध्या मालिकेत दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत कुकी कामानिमित्त मुंबईत गेल्याचे दाखवले आहे. पण खऱ्या आयुष्यात अतुल तोडणकर एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत गेला आहे. दरम्यान तिथे त्याच्यावर मोठं संकट ओढावलं. तिकडे गेल्यानंतर कांजन्याचे व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे अर्धा चेहरा आणि डोळ्याला सूज आली होती. त्याची ही अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.
अभिनेता अतुल तोडणकर याने इंस्टाग्रामवर फोटोंचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आज एका लग्नाची पुढची गोष्ट या आमच्या नाटकाचा दुसरा अमेरिका दौरा संपला.. खूप संमिश्र आठवणी. शो मस्ट गो ऑन. माझा हा अमेरिका चा तिसरा दौरा..मोठेपणा मिरवत नाहीय. म्हणजे तशी इथल्या वातावरणाची सवय आणि अंदाज आलाय.. पण या वेळेस गंम्मत केली अमेरिकेने.
तो पुढे म्हणाला की, हाऊसफ़ुल्ल शो चालू होते. शिकागो, सेंट लुईस आणि डॅल्लसचा शो झाल्यावर मला शिंगल्स चा त्रास झाला.. म्हणतात की कांजन्याची वायरल इन्फेक्शन.. अर्धा चेहरा आणि डोळा सुजला होता.. पण अमेरिकेचे दर्दी रसिक प्रेक्षक, त्यांचा तुफान प्रतिसाद, आमची नाटकाची टीम आणि आमचा जादूगार प्रशांत दामले यांच्यासमवेत, त्या प्रत्येक तीन तासात काहीतरी घडायचं आणि प्रयोग पार पडायचा.. आज आमची दौऱ्याची सांगता झालीय आणि मी पूर्ववत होतो तसा झालोय.. हीच तर नाटकाची गंम्मत आहे मित्रांनो. या दोन्हीही वीकेंडला प्रत्येक सेंटरला निष्णात डॉक्टर तैनात होते, ट्रीटमेंट उत्तम चालू होती.. प्रशांत सर, आऊ, कविता आणि माझ्या संपूर्ण टीमचा मी ऋणी आहे. अजय-वसुधा निहार पटवर्धन, अतुल अरनके, राहुल कर्निक, सर्वांना खूप खूप प्रेम.