सलील कुलकर्णी हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक आहेत. त्यांनी आजवर अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दलची माहिती देणाऱ्या पोस्टबरोबरच ते अनेकदा व्हिडिओ आणि फोटोही शेअर करताना दिसतात. नुकतंच त्यांनी शेअर केलेला असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
सध्या सगळीकडे वर्ल्डकपचा फिव्हर आहे. सलील कुलकर्णीदेखील क्रिकेटचे चाहते आहेत. रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तानमधील रोमहर्षक सामन्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते क्रिकेट फॅन्सबद्दल बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात, "खऱ्या क्रिकेट फॅनला क्रिकेटच आवडतं. तो कुठलीही मॅच बघतो. कुठल्या मैदानावरची टेनिस चेंडू क्रिकेट स्पर्धा असली तरी त्याची गाडी आपोआप स्लो होते. गल्लीतील क्रिकेटही तो इंटरेस्टनेच बघतो. खरा क्रिकेटवेड IPL मध्ये त्याचे इमोशन्स अडकवत नाही. तो इंडियाच्या मॅचला भावनिक होतो. आदल्या दिवशीपासून त्याची चर्चा सुरू होते. मग तो मित्रांना फोन करतो आणि कसं आपणच जिंकू याची खात्री करून घेतो. भारत जिंकेल असं म्हणणारे मित्र त्याला आवडायला लागतात. आणि मग मॅचच्या दिवशी घरात अस्वस्थ होऊन चकरा सुरू होतात. T20 चा नसला तरी 50 ओव्हर वर्ल्डकपची जर्सी ते घालून बसतात. टॉसच्या वेळी त्यांच्या हाताला घाम वगैरे येणं सुरू होतं".
पुढे ते म्हणतात, "टॉसपासूनच त्यांना वाटतं की मला जे वाटतं तेच होणारे. माझं मनं सांगतंय की हाच खेळणार आहे. मग त्यादिवशी तो नाही खेळला तर त्यांना वाटतं की पुढच्या मॅचला खेळेल. त्यांना कुणालाही सचिन, धोनी, कोहली, रोहित शर्मा, बुमराह, पांड्या कोणाविषयी वाईट बोललेलं आवडत नाही. मग ते जुन्या आठवणी काढतात. वर्ल्डकपमधील कपिल देवचा कॅच त्यांना आठवतो. प्रत्येक मॅच आणि त्याच्या आठवणी त्यांना येतात. मग ते मॅच संपल्यानंतर प्रेंझेटेशनही पूर्ण बघतात. मग टीव्ही बंद करतात आणि फोनवर एकदा हायलाइट्स परत बघतात. आणि मग ते झोपतात. दुसऱ्या दिवशी ते सगळ्या पोस्ट पुन्हा बघतात. मित्रांना फोन करून ते त्यावर चर्चा करत राहतात. ते खरे क्रिकेट फॅन्स...".
काही दिवसांपूर्वी सलील कुलकर्णींनी अमेरिकाचा मराठमोळा खेळाडू सौरभ नेत्रावळकरचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत सौरभ सलील कुलकर्णी यांचं 'रे क्षणा थांब ना' हे गाणं गाताना दिसत होता. त्याचा हा व्हिडिओ शेअर करत सलील कुलकर्णींनी त्याचं कौतुक केलं होतं.