'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील भिडे मास्तर म्हणजेच आत्माराम भिडेंच्या लेकीच्या भूमिकेत दिसलेली सोनू आठवतेय? आतापर्यंत सोनूच्या भूमिका तीन अभिनेत्रींनी केल्या. त्यातली पहिली सोनू म्हणजेच अभिनेत्री झील मेहता (Jheel Mehta) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत तिने साकफेरे घेतले. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी झील भावुक झाल्याचंही दिसत आहे.
'सोनू भिडे' भूमिकेमुळे झील मेहताला खूप लोकप्रियता मिळाली होती. २००८ ते २०१२ ती या मालिकेत काम करत होती. नंतर तिने अभिनय क्षेत्रालाच रामराम केला. तिने आईसोबत स्वत:चा बिझनेस सुरु केला. तर नुकतंच २८ डिसेंबर २०२४ रोजी तिने आदित्य दुबेसह लग्नगाठ बांधली. त्यांचे तीन वेडिंग व्हिडिओ समोर आले आहेत. वेडिंग लूकमध्ये झील खूप सुंदर दिसत आहे. लाल रंगाचा भरजरी लेहेंगा, बिंदी, बांगड्या, गळ्यात जड हार, मॅचिंग इअररिंग्स परिधान केले आहेत. तर आदित्य शेरवानीमध्ये दिसत आहे. डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा बांधला आहे. त्यांचा हा लग्नाचा व्हिडिओ अगदी स्वप्नवत वाटावा असाच आहे. व्हिडिओमध्ये झील म्हणते, "मी आज इतकी खूश आहे की माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इतके वर्षांचं प्रेम आज सफल झालं आहे."
या व्हिडिओवर सर्व चाहत्यांनी कमेंट करत झीलला शुभेच्छा दिल्या आहेत. झील आणि आदित्य दुबे कॉलेजपासून एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या नात्याची कबुली देत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. आदित्यने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झीलला प्रपोज केले होते. यानंतर दोघांचा साखरपुडाही झाला. तर वर्षाच्या शेवटी ते लग्नबंधनात अडकले.