'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचा वाद संपता संपत नाहीए. मालिकेतील कोणी ना कोणी पात्र समोर येत निर्मात्यांची पोलखोल करत आहे. तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर बरीच चर्चा झाली. नुकतंच अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. 'बावरी' म्हणजेच अभिनेत्री मोनिका भदोरियाने सुद्धा पोलखोल केली. तर आता मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजाने देखील मेकर्सवर काही आरोप केले आहेत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या २० वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शोच्या सुरुवातीपासूनच अभिनेत्री प्रिया आहुजा रिटा रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. माध्यमांशी बोलताना प्रिया म्हणाली," मालिकेत काम करताना मी मानसिक त्रास सहन केला. पण मला या गोष्टीचा फारसा फरक पडला नाही कारण माझे पती मालव १४ वर्षांपासून शोचे दिग्दर्शक होते. ते पैसे कमवत होते. असित मोदी, सोहेल रमानी कधीही माझ्यासोबत वाईट वागले नाहीत. पण कामाचं बोलायचं झालं तर माझ्यासोबत नेहमी चुकीचं केलं गेलं. मालवसोबत लग्न केल्यानंतर त्यांनी माझी भूमिका कमी केली होती. मी भूमिकेसाठी अनेकदा असित मोदींशी संपर्क केला पण त्यांनी रिप्लाय दिला नाही."
ती पुढे म्हणाली,"असित मोदी मला नेहमी म्हणायचे तुला काम करण्याची काय गरज आहे पती कमवत आहे तू राणीसारखी राहा. मालव आहे ना. मालव काम करत होता आणि मी इतर शो मध्ये काम करायला लागले त्यामुळे आर्थिक समस्या आली नाही.पण जेव्हापासून मालवने मालिका सोडली असित मोदींनी मलाही भूमिकेसाठी संपर्क केला नाही. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून त्यांचं वागणं बघितलं तर मला असंच वाटतंय की आता ते मला कधीच कॉल करणार नाहीत."
मला माशीसारखं बाजूला केलं
प्रिया म्हणाली,"माझ्या पतीने १४ वर्ष मालिकेचं दिग्दर्शन केलं पण तरी त्यांना आदराची वागणूक मिळाली नाही. मोनिका आणि जेनिफरने केलेले आरोप खरेच असतील. कारण मेकर्स मलाही कधीही आदरपूर्वक वागणूक दिली नाही. मालव सोडून गेला म्हणून मलाही ९ महिन्यांपासून मालिकेत बोलावलं नाही. मला माशीसारखं बाजूला केलं."